जहाजाची नेरुळ जेट्टीला धडक
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 20, 2026
- 25
कॅप्टनविरुध्द गुन्हा दाखल
नवी मुंबई : भरतीच्या वेळेस मार्ग भरकटलेल्या मोठ्या व्यावसायिक जहाजाने नेरुळ येथील पॅसेंजर आणि वॉटर ट्रान्सपोर्ट टर्मिनलच्या जेट्टीला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात सिडकोच्या मालकीच्या जेट्टीचे प्रचंड नुकसान झाले आहे. एनआरआय सागरी पोलिसांनी या दुर्घटनेला जबाबदार धरुन जहाजाच्या कॅप्टनविरुध्द गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
सिडकोने नेरुळ, सेक्टर-32 च्या समुद्रकिनाऱ्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी पॅसेंजर आणि वॉटर ट्रान्सपोर्ट टर्मिनल नावाने जेट्टी उभारली आहे. या जेट्टीचे व्यवस्थापन सध्या दृष्टी लाईफ सेविंग प्रा. लि. या कंपनीकडे आहे. 2 जून 2026 रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास समुद्रात भरती आलेली असताना, सेगल ग्रुप ऑफ कंपनीजचे सी-गौतम नावाचे मोठे व्यावसायिक जहाज आपल्या निर्धारित मार्गावरुन जात होते. मात्र, कॅप्टनचे या जहाजावरील अचानक नियंत्रण सुटल्याने जहाज नेरुळ येथील थेट जेट्टीवर जाऊन आदळले. जहाजाची धडक इतकी भीषण होती की, जेट्टीवरील टाईड कॅफे कॅन्टीनच्या मागील बाजुच्या टर्निंग पलॅटफॉर्मचे नुकसान झाले. अपघातामध्ये जेट्टीच्या पायऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पायऱ्यांवर असलेले सुमारे 100 चौरस मीटर क्षेत्रातील पॉलिकार्बोनेटचे छत (कॅनोपी) पूर्णपणे चेंदामेंदा होऊन कोसळले आहे. तसेच छताला आधार देणारे साधारण 12 ते 14 लोखंडी पोल आत दाबले गेले असून येथील टाईल्स आणि आधाराचा पायाही उखडला गेला आहे.
घटनेनंतर सिडकोच्या अधिकाऱ्यांंनी जेट्टीची पाहणी करुन तसेच या दुर्घटनेचे ऑडिट केले असता, या जेट्टीच्या केवळ वरील बाजुच्या दुरुस्तीसाठी 25 ते 30 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे आढळून आले आहे. मात्र, अपघात झाला तेव्हा समुद्रात भरती असल्याने जेट्टीचे पाण्याखालील खांब, पलोटिंग पॉन्टून जोडणी आणि लिंक स्पॅन यांच्या संरचनेला किती हानी पोहोचली आहे, याची तपासणी अद्याप झालेली नाही. एकूणच या दुर्घटना प्रकरणी सिडकोचे अभियंता संतोष बिरादार यांनी एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai