बनावट आदेश पाठवल्याने सागर नाईक अडचणीत?
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 27, 2026
- 36
बनावट आदेश पाठवल्याने सागर नाईक अडचणीत?
न्यायालयाचे चौकशीचे आदेश; अज्ञात इसमावर गुन्हा दाखल
नवी मुंबई : न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेला नसताना नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्या मोबाईलवर स्थगितीचा बनावट आदेश पाठवून अनधिकृत बांधकामावरील कारवाई थांबवण्याचा प्रयत्न माजी महापौर व सभागृह नेते सागर नाईक यांच्या मोबाईलवरुन झाल्याची चर्चा सध्या नवी मुंबईत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल थेट न्यायालयानेच घेऊन गुन्हा नोंदवल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी अधिवेशनात आवाज उठवल्याने नाईकांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जाते.
नवी मुंबई महापालिकेने सारसोळे गावातील सर्व्हे क्रमांक 91 आणि 92 मधील सुमारे 600 चौरस मीटर जागेवरील तळमजला अधिक पाच मजल्यांच्या इमारतीला अनधिकृत बांधकामाची नोटीस बेबीबाई मधुकर ठाकूर यांना 22 एप्रिल 2026 रोजी बजावली होती. या दाव्यावरील निर्णय प्रलंबित असताना मोबाईल क्र. 7303413588 वरुन पालिका आयुक्त कैलास शिंदे यांना न्यायालयाने पाडकामाला स्थगिती दिली असल्याचे आदेशाची प्रत व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात आली. पालिका आयुक्तांनी त्याची खातरजमा करण्याचे आदेश विधी विभागाला दिले असता सदर आदेश बनावट व खोटे असल्याचे निष्पन्न झाले. सदर बाब पालिकेच्या विधी विभागाने न्यायालयाच्या नजरेस आणून दिली असता न्यायालयाने स्वतः या गंभीर घटनेची दखल घेत अज्ञात इसमाविरुद्ध सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सदर फोन नं. हा ट्रु कॉलरवर पालिकेचे सभागृह नेते यांचे नावावर असल्याचे दिसत आहे.
बनावट न्यायालयीन आदेशाची चर्चा नवी मुंबईत सुरु झाल्यानंतर बेलापुरच्या आ. मंदाताई म्हात्रे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे सदर प्रकरण पावसाळी अधिवेशनात उपस्थित केले. या प्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली असून यामागील सूत्रधार आणि संभाव्य भूमाफिया साखळी समोर आणावी, अशी मागणी केली. दरम्यान, या प्रकरणात कोणत्याही विरोधकाने अद्यापपर्यंत प्रतिक्रिया दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. दरम्यान आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांकडून कारवाई रोखण्यासाठी सादर करण्यात आलेल्या न्यायालयीन आदेशांची माहिती मागविण्यात आली आहे. विशेषतः हस्तलिखित शेरा, अतिरिक्त नोंदी अथवा स्थगितीबाबत उल्लेख असलेल्या आदेशांच्या प्रती, संबंधित फाइल्स आणि कागदपत्रे विधी विभागाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
बेलापूर येथील चौथे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) विनायक एच. विश्वास यांनी न्यायालयीन आदेशात फेरफार झाल्याचे नमूद करत न्यायालयाचे खोटे आदेश तयार करणे हा गंभीर गुन्हा असून याप्रकरणाची गंभीर चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगत गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण कृष्णा भिलारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याप्रकरणात सागर नाईक यांचे नाव आल्याने पोलीस कसा तपास याकडे आता नवी मुंबईकरांचे लक्ष लागलेआहे.
- जुन्या प्रकरणांकडेही नव्याने लक्ष
विविध विभागांतील जुनी प्रकरणेही पुन्हा तपासली जात असून, न्यायालयीन आदेशांचा गैरवापर करून कारवाई रोखण्यात आली होती का, याची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील प्रलंबित अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणांकडेही नव्याने लक्ष वेधले गेले आहे. न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महापालिकेने संबंधित अनधिकृत इमारतीविरोधातील कारवाई पुन्हा सुरू केली. बनावट आदेशाच्या आधारे कारवाई रोखण्याचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर अतिक्रमणविरोधी पथकाने संबंधित बांधकामावर तोडक कारवाई हाती घेतली आहे. - तपासाकडे सर्वांच्या नजरा
महापालिका आयुक्तांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. न्यायालयीन आदेशात फेरफार कोणी केला, बनावट दस्तऐवज आयुक्तांपर्यंत कसा पोहोचला, तसेच याच पद्धतीने इतर अनधिकृत बांधकामांनाही संरक्षण मिळवून देण्यात आले आहे का, याचा उलगडा आता तपासातून होणार आहे. त्यामुळे या प्रकरणामागील सूत्रधार आणि संभाव्य साखळी समोर येते का, याकडे प्रशासनासह शहराचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai