पाणी बचत व पर्यायी वापराबाबत पालिकेचे नियोजन
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 03, 2026
- 12
नवी मुंबई ः भारतीय हवामान विभागाने अल-निनोच्या प्रभावामुळे जून ते सप्टेंबर 2026 या कालावधीतील नैऋत्य मान्सून पावसाचा दीर्घकालीन अंदाज प्रसिद्ध केला आहे. या अंदाजानुसार देशातील हंगामी पर्जन्यमान हे दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी होणार आहे.
त्यास अनुसरून आयुक्तांनी पाणी बचतीबाबत पाणी पुरवठा विभागाने अंमलबजावणी केलेल्या उपाययोजनांचा रविवारी 28 जून रोजी सविस्तर आढावा घेतला. सद्यस्थितीत दि.28 जून पर्यंत मोरबे धरणामध्ये केवळ 17.863 द.ल.घ.मी. (9.36%) इतके पिण्यायोग्य पाणी शिल्लक आहे. सदर उपलब्ध जलसाठा किमान 31 ऑगस्टपर्यंत पुरविणे व पुढील वर्षीच्या ऑगस्ट 2027 पर्यंत उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन, नवी मुंबई शहरातील उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोर, शाश्वत व कार्यक्षम वापर सुनिश्चित करणे याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. नवी मुंबई पालिकेमार्फत यापूर्वीच करण्यात आलेली 10% पाणीकपात व दैनंदिन पाणी वापरामुळे मोरबे धरणातील जलसाठ्याचे सातत्याने कमी होणारे प्रमाण या अनुषंगाने पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत व प्रभावी उपाययोजनांबाबत चर्चा करीत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी महत्वपूर्ण निर्देश दिले. यामध्ये गृहनिर्माण संस्थेतील सर्व पदाधिकारी /नागरिक यांना पाणी बचतीबाबत व मोरबे धरणातील उपलब्ध जलसाठ्याबाबत नियमितपणे अवगत करावे, जेणेकरून त्यांना सद्यस्थितीची कल्पना राहील अशा सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे, पाणीपुरवठ्याबाबत विभाग स्तरावर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने सूक्ष्म जलनियोजन कृती आराखडा तयार करावा आणि कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा), उपअभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता व संबंधित क्षेत्रातील सर्वसमावेशक देखभाल व दुरुस्ती कंत्राटदार यांनी तो काटेकोरपणे अंमलात आणावा.
पालिकेमार्फत गृहनिर्माण संस्थेला होणारा दैनंदिन पाणीपुरवठा हा उपलब्ध जलसाठ्यानुसार होत असल्याने, त्यामध्ये वारंवार कपात होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पालिकेमार्फत गृहनिर्माण संस्थेला होत असलेल्या पाणीपुरवठ्याचा काळजीपूर्वक व प्रभावीपणे वापर करणेबाबत संबंधितांना सूचित करावे असेही निर्देश देण्यात आले. पालिकेमार्फत शहरातील सर्व विहिरी व बोअरवेल्स यांची तातडीने पुढील पाच दिवसांत सलग स्वच्छता करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात यावे. त्या सदर ठिकाणी आवश्यकतेनुसार आर.ओ.प्रणाली बसवून तसेच सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी कार्यक्षम पंपिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात यावी असेही निर्देश देण्यात आले. व्यावसायिक व वाणिज्यिक ग्राहकांना यापूर्वीच 20 % पाणीकपात करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार संबंधित आस्थापनांकडून पाणीकपात होत असल्याबाबत तपासणी करून खातरजमा करण्यात यावी. आणि तसे केल्याचे न आढळल्यास संबंधित आस्थापनांना नोटीस देऊन त्यांच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करणेत यावी असेही स्पष्ट करण्यात आले.
- प्रक्रियाकृत सांडपाण्याचा वापर करण्याचे निर्देश
सद्यस्थितीत महापालिकेकडे 52.50 द.ल.लि. इतके तृतीय स्तरीय प्रक्रियाकृत सांडपाणी उपलब्ध आहे. या पाण्याचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी सर्व विभागनिहाय कृती आराखडा पालिकेमार्फत तयार करावा. त्यानुसार प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात टँकरद्वारे प्रक्रियाकृत सांडपाणी पुरवठा करण्यासाठी टँकर फिलिंग पॉइंट्स विकसित करावेत असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. हे तृतीयस्तरीय प्रक्रियाकृत सांडपाणी सर्व बांधकामधारक तसेच मोठ्या गृहनिर्माण संस्थेतील उद्याने यांना आवश्यकतेनुसार त्यांच्या स्वतःच्या वाहनाव्दारे /टँकरद्वारे उपलब्ध करून दिले जाईल, याबाबत व्यापक जनजागृती करावी असेही सूचित करण्यात आले. पालिकेमार्फत सर्व सार्वजनिक शौचालये व सामुदायिक शौचालयांसाठी तृतीयस्तरीय प्रक्रियाकृत सांडपाणी / पुनरुज्जीवित विहिरींमधील अथवा बोअरवेल्स मधील पाण्याचा 100 % वापर करण्यात यावा अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai