भिवंडी महापालिकेतील 24 उमेदवार अपात्र
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2026
- 28
3 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी; कोकण विभागीय आयुक्तांकडून कारवाई
नवी मुंबई : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन केले, त्यांना आता मोठा फटका बसला आहे. निवडणूक लढवूनही विहित मुदतीत आपल्या निवडणूक खर्चाचा अधिकृत हिशोब सादर न करणाऱ्या 24 उमेदवारांना कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक लढवण्यास आणि महानगरपालिकेचे सदस्य होण्यास अपात्र (अनर्ह) घोषित केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आपल्या खर्चाचा लेखाजोखा देणे बंधनकारक असतानाही, वारंवार दिलेल्या संधीचा फायदा न घेणाऱ्या या उमेदवारांवर अखेर कायदेशीर बडगा उगारण्यात आला आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक-2026 करिता एकूण 438 उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब तपासणी अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक होते. मात्र, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा तपासणी अधिकारी यांनी पाठवलेल्या 27 एप्रिल 2026 च्या अहवालानुसार 24 उमेदवारांनी मुदतीचे उल्लंघन करत खर्चाचा तपशील सादर केला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने या उमेदवारांना अनर्ह ठरवण्यासाठीचा प्रस्ताव नमुना सहा अन्वये कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवला होता.
प्रशासकीय प्रक्रियेदरम्यान संबंधित उमेदवारांना नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी देण्यात आली होती. यासाठी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात 25 मे 2026 आणि 29 जून 2026 अशी दोन वेळा सुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या दोन्ही सुनावणीच्या वेळी संबंधित उमेदवार अनुपस्थित राहिले. उमेदवारांच्या या उदासीनतेमुळे त्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांचे आणि कायदेशीर तरतुदींचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचे सिद्ध झाले. कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी महानगरपालिका अधिनियम, 1949 चे कलम 10 (1 ई) आणि राज्य निवडणूक आयोगाच्या 15 फेब्रुवारी 2024 रोजीच्या आदेशान्वये मिळालेल्या विशेष अधिकारांचा वापर करत 2 जुलै 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला. या आदेशानुसार अपात्र ठरवण्यात आलेल्या 24 उमेदवारांमध्ये कृतिका शरद पाटील, गायकवाड विजया अशोक, शरद पाटील, अन्सारी रेहान मुस्ताक, तेजश्री सागर पाटील, शेख शोएब सलीम, सलीम अन्सारी, अन्सारी जरीना रफीउजमा, अन्सारी तुंबा शकील, खान रिजवान रहीमुल्लाह, खान रविश हाजी ईखलाक, हाशमी इमरान अहमद इस्तेयाक, मोमीन नदीम मोहम्मद मुस्तकिम, अन्सारी कमरुन्निसा कासिम, अजीम रहेमान शेख, अनुशा श्रीनिवास वेंगल, विजय पुरुषोत्तम कारमपुरी, घोईल रीतीषा महेश, तांबे अस्मिता अरुण, गायकवाड नितेश वामन, अंसारी सोहेल जावेद अहमद, निरबान मोहसिन जाकीर हुसैन, खान आजम मुक्त्तार आणि म्हात्रे सुशांत भास्कर या उमेदवारांचा समावेश आहे. सदर अनर्हतेचा हा कालावधी आदेश जारी झाल्याच्या दिनांकापासून म्हणजेच 02 जुलै 2026 पासून पुढील तीन वर्षांपर्यंत लागू राहील, असेही या अधिकृत पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai