नवनगर प्रकल्पातील गैरकारभाराच्या चौकशीचेे आदेश
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 15, 2026
- 35
सामाजिक कार्यकर्ते रमाकांत पाटील यांच्या पाठपुराव्यास यश
उरण ः पनवेल, उरण, पेण तालुक्यात एमएमआरडीए मार्फत प्रस्तावित नवनगर प्रकल्पातील गैरकारभाराच्या तक्रारीची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन उपजिल्हाधिकारी भूसंपादन रायगड यांनी कार्यकारी अभियंता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना तक्रारदाराने नमूद केलेल्या मुद्द्यांची सखोल चौकशी करून तातडीने नियमोचित कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले आहे.
स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा मोठा विरोध असूनही नवनगर प्रकल्प अर्थात तिसरी मुंबई विकसीत करण्याचा घाट शासनाने घातला आहे. या प्रकल्पात कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन, पुनर्वसनातील त्रुटी, शासकीय कारभार, शेतकऱ्यांचे होणारे विस्थापन व फसवणूक तसेच जैवविविधतेचा होणारा ऱ्हास याबाबत सामाजिक कार्यकर्ते रमाकांत पाटील यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यांच्याकडे 3 मे 2026 रोजी तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने राज्य शासनाने उपजिल्हाधिकारी भूसंपादन रायगड यांनी कार्यकारी अभियंता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना तक्रारदाराने नमूद केलेल्या मुद्द्यांची गांभिर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करून तातडीने नियमोचित कार्यवाही करण्याबाबत लेखी पत्रान्वये आदेशित केले आहे.
सदर आदेशात उक्त चौकशीत विलंब होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कोकण विभाग यांना सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. आपल्या तक्रारीची गंभीर दखल शासनाने घेतली असून प्रस्तावित प्रकल्पामधून होणारे शेतकऱ्यांचा तसेच पर्यावरण जैवविविधता यांचे नुकसान याबाबत योग्य सुधारणा न झाल्यास व शेतकऱ्यांना योग्य न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे याचिका दाखल करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रमाकांत पाटील यांनी घोषित केले आहे.
प्रस्तावित तिसऱ्या मुंबई विरोधात पनवेल उरण पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. तिसऱ्या मुंबईला विरोध म्हणून उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे (पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील चिरनेर येथे शेतकऱ्यांची सभा झाली होती. या सभेत शेतकऱ्यांनी तिसऱ्या मुंबईला तीव्रपणे विरोध केला होता. शेतकऱ्यांना, स्थानिक भूमीपुत्रांना विश्वासात न घेता, त्यांच्या कोणत्याही मागण्यांची दखल न घेता शासन तिसरी मुंबई प्रकल्प जबरदस्तीने शेतकऱ्यांवर लादत आहे. शासनाचे एकतर्फी व मनमानी कारभार सुरु असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai