गृहनिर्माण संस्थेत कोविड केंद्र सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- May 19, 2021
- 885
ऐरोलीतील यश पॅरडाइज सोसायटीतील उपक्रम ; विजय चौगुुले यांचा पुढाकार
नवी मुंबई ः ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी पुढाकार घेऊन यश पॅरडाइज इमारतीत 26 बेड्सच्या कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. या सेंटरचे उद्घाटन मंगळवारी नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ही संकल्पना राबवण्यासाठी पुढाकार घेणे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार यावेळी शिंदे यांनी काढले.
पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसर्या लाटेतील रुग्णांची संख्या धडकी भरवणारी आहे. त्यामुळे काही रुग्णांना खाटा, प्राणवायू सुविधा उपलब्ध करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे गृहसंकुलाच्या आवारात करोना केंद्र निर्माण व्हावे यासाठी काही महापालिका प्रयत्नशील आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विजय चौघुले यांनी पुढाकार घेऊन ऐरोलीतील यश पॅरडाइज गृहनिर्माण संस्थेत इमारतीत वातानुकूलित कोरोना केंद्र उभे केले आहे. यश पॅरडाइज सोसायटीच्या कम्युनिटी हॉलमध्ये सुरू करण्यात आलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये एकावेळी 26 रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. यात 15 ऑक्सिजन बेड्स आणि पाच आयसीयू बेडसचा समावेश आहे. सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम सुरू केला असल्याचे चौगुुले यांनी स्पष्ट केले.
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर आपण सारे कोरोना संपला, असे समजून निर्धास्त झालो होतो; मात्र कोरोनाची दुसरी लाट आली आणि आपल्याला आपल्या मर्यादा लक्षात आणून दिल्या. त्यामुळेच गाफिल न राहाता आपण आपली तयारी चोख करायला हवी आणि त्यादृष्टीने सोसायटीच्या आवारात कोविड केंद्र सुरू करण्याची ही कल्पना उत्तम आहे. यामुळे मोठ्या सोसायटीमधील नागरिकांना सोसायटीच्या आवारातच उत्तम वैद्यकीय सुविधा देता येतील आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे शिंदे यांनी सांगितलं. कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी जास्त धोकादायक आहे, मात्र ही लाट येऊ नये यासाठी सतर्क राहण्याची आणि वेळीच लस घेण्याची गरज शिंदे यांनी व्यक्त केली. त्यासोबतच म्युकरमायकोसिस सारखे गंभीर आजार होऊ नयेत, यासाठी देखील जास्त दक्ष राहाण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. कोरोनाच्या दुसर्या लाटेत ऐरोली मधील नागरिकांची नि:स्वार्थपणे सेवा करणार्या डॉक्टरांचा यावेळी शिंदे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पालकमंत्री शिंदे यांच्यासह ठाण्याचे खासदार राजन विचारे, राज्यस्तरीय कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित, नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai