वाहतूक पोलीसांना बॉडीवॉर्न कॅमेरे
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 13, 2026
- 25
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 45 कॅमेरे वितरीत
नवी मुंबई ः वाहतूक व्यवस्था अधिक पारदर्शक आणि हायटेक करण्यासाठी तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यासाठी गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील वाहतूक पोलीसांकडे बॉडीवॉर्न कॅमेरे अनिवार्य केले आहेत. यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नवी मुंबई वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे देण्यात आले आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या कामात अचूकता तर येईलच; शिवाय वाहन धारकांशी होणारे वाद आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींनाही लगाम बसणार आहे.
नवी मुंबई पोलिसांना 45 बॉडीवॉर्न कॅमेरे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वाहतूक पोलिसांच्या छातीवर कॅमेरे बसविले. यावेळी उपमुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी डॉ.श्री कृष्णनाथ पांचाळ, आ.किसन कथोरे, नवी मुंबईचे एपीआय अशोक वाघ तसेच वाहतूक पोलीस उपस्थित होते. याविषयी अधिक माहिती देताना वाहतूक शाखेचे अधिकारी म्हणाले की, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह.आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या प्रयत्नामुळे वाहतूक पोलिसांना एक प्रकारे सुरक्षा कवच मिळाले आहे. या बॉडीवॉर्न कॅमेऱ्यामुळे वाहतूक पोलिसांनी चलन फाडल्यानंतर होणारे वाद टळणार आहेत. तसेच वाहतूक नियंत्रण करणे सोपे होणार असून वाहतूक पोलिसांचे लोकाशन, वाहतूकीची सद्यस्थिती काय आहे याचे चित्रिकरण केले जाणार आहे. तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सीसीटिव्ही मॉनिटरींग सेंटरमध्ये या कॅमेऱ्याचा रेकॉर्ड ठेवला जाणार आहे. वाहतूक विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा नियोजन विकास समिती (डीपीडीसी) ठाणे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यात एकूण 430 बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचा प्रस्ताव असून त्यासाठी 1.97 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात 98.8 लाख रुपये वितरित झाले असून, 230 कॅमेऱ्यांच्या खरेदीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याचप्रमाणे पोलीस वाहनांसाठी 100 डॅश कॅमेऱ्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सद्यस्थितीत मंत्रालयाकडून तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया सुरु असून, या कॅमेऱ्यांच्या चाचण्या प्रगतीपथावर आहेत.
अनेकदा वाहतूक नियम मोडल्यावरुन पोलीस आणि नागरिक यांच्यात खटके उडतात. अशा वेळी बॉडी वॉर्न कॅमेरा हा ठोस पुरावा म्हणून काम करेल. तसेच, पोलीस वाहनांवरील डॅश कॅमेऱ्यांमुळे रस्ते अपघात किंवा गुन्हेगारी घटनांचे थेट चित्रीकरण उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पारदर्शकता वाढणार असून गुन्हेगारीला चाप बसणार आहे. त्याचप्रमाणे पोलिसांवरील खोटया आरोपांना आळा बसेल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक नजर राहील. तसेच डिजिटल पुराव्यांमुळे न्यायालयीन प्रक्रियेत मदत होणार आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करुन पोलीस दलाला अधिक कार्यक्षम बनवणे हा आमचा उद्देश आहे. बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांमुळे पोलिसांच्या कामकाजात पारदर्शकता येईल आणि डॅश कॅमेऱ्यांमुळे गस्ती दरम्यानच्या घटनांचे अचूक दस्तऐवजीकरण होईल. यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासार्हता अधिक वाढेल. -मिलिंद भारंबे (पोलीस आयुक्त, नवी मुंबई)
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai