आर.के.फाउंडेशनच्या कारभाराला विरोध
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 22, 2021
- 768
शिक्षकांसह कर्मचारी-पालकांचे बेमुदत आंदोलन
उरण ः जेएनपीटी येथील आर.के.फाउंडेशनच्या मार्फत चालविण्यात येणार्या शाळेच्या कारभाराविरोधात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांकडून कडाडून विरोध होत आहे, गेली दोन वर्षे या लढ्यात न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला असला तरी मात्र आर.के.फाउंडेशनने न्यायालयाच्या निकालाचा अवमान करून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांवरील अन्याय सुरूच ठेवला आहे. गतवर्षी 6 शिक्षकांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी करण्यात आल्यानंतर आता तर शाळेच्या मुख्याध्यापकांना सुद्धा घरी बसविण्याचा प्रकार केला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ गेले दोन दिवस जेएनपीटी टाऊनशिप येथे शिक्षकांसह कर्मचारी आणि पालकांनी शाळेच्या गेटवर बेमुदत आंदोलन सुरु केले. शिक्षक नेते नरसू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले.
जेएनपीटी येथील इंडीयन एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गेले 30 वर्षे या शाळेचे योग्यरीत्या काम सांभाळले. त्यावेळी जेएनपीटी प्रशासन हे शाळेला उत्तम प्रकारे आर्थिक सहकार्य करीत होते. मात्र आर.के.फाउंडेशनने व्यवस्थितरीत्या सुरु असलेल्या शाळेला आपल्या ताब्यात घेण्यासाठी जेएनपीटी प्रशासनाकडे गळ घातली. काही आर्थिक हितसंबंध जपत जेएनपीटीमार्फत शून्य बजेट तत्वावर शाळा चालवण्याबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यावेळी इंडियन एज्युकेशन सोसायटीला शून्य बजेटवर शाळा चालविणे म्हणजे पालकांच्या डोक्यावर अधिभार द्यावा लागणार होता. म्हणून शाळेने शून्य बजेटवर शाळा चालविण्याच्या निघालेल्या निविदेला विरोध केला. मात्र या सार्या प्रकारात आर.के.फाउंडेशनने आपला स्वार्थ साधून शून्य बजेटवर शाळा चालविण्यासाठी निविदा भरली आणि जून 2019 मध्ये इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना विश्वासात न घेता आर.के.फाउंडेशनने बेकायदेशीररीत्या शाळेचे हस्तांतरण करण्यासाठी धडपड सुरु केली. असे असतानाही आजपर्यंत हस्तांतर न होता शिक्षकांवर आणि विद्यार्थ्यांवर बेबंदशाहीची हुकूमत करीत अन्याय सुरु केल्यामुळे अखेर या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालकांच्या सहकार्याने न्यायालयात गेले, तिथे शिक्षकांना न्यायालयाकडून न्याय मिळाला. मात्र आर.के.फाउंडेशनच्यावतीने न्यायालयाच्या या आदेशालाच केराची टोपली दाखवली आहे. टावूनशिप येथील आर.के.फाउंडेशनने शाळा प्रशासनाला जागा दाखविण्यासाठी अखेर पालकांसह विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना शाळेच्या गेटवर बेमुदत आंदोलन सुरु करावे लागले.
आर.के.फाउंडेशनने अनेक कर्मचार्यांना सेवेतून निलंबित करण्याचे लेखी आदेश जारी केले आहेत. अखेर शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्यावर झालेल्या अन्यायांच्याविरोधात जेएनपीटी येथील टाऊनशिप परिसरात असलेल्या आर.के.फाउंडेशनच्या व्यवस्थापकांविरोधात तसेच जेएनपीटी व्यवस्थापक यांच्याविरोधातील आपला लढा अधिक तीव्र होणार असल्याची भावना यावेळी शिक्षक आणि पालकांमधून व्यक्त करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai