अर्थसंकल्पातील खर्चाच्या बाबी
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 18, 2023
- 432
नवी मुंबई महानगरपालिकेस विविध करांच्या रुपाने प्राप्त होणाऱ्या महसूलातून नागरिकांना अपेक्षित व आवश्यक सेवा सुविधा पुरविण्यात येत असून यामध्ये सर्व घटकांचा विचार करण्यात आलेला आहे. त्यादृष्टीने अपेक्षित उत्पन्नचा अंदाज घेऊन खर्चाच्या बाबींचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आलेला आहे.
प्रशासकीय / निवासी इमारती / इतर मालमत्ता बांधकाम :- कोपरखैरणे विभागातील सेक्टर 11, भूखंड क्र. 14 येथे अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधण्याचे काम हाती घेण्याचे नियोजन असून त्याकरिता रक्कम रु. 79.80 कोटी खर्च येणार आहे. त्याकरिता लेखाशिर्षांतर्गत भरीव तरतूद करण्यात आली आहे.
स्थापत्य कामे :- सिडकोने बांधलेल्या पामबीच मार्गातील वाशीच्या पुढे घणसोली ते ऐरोली या 1.95 किमी लांबीचा उर्वरित पामबीच रस्ता व पुढे ऐरोली-काटई रस्त्यास जोडणे असा एकत्रित 3.25 किमी लांबीच्या रस्त्यासाठी रक्कम रु. 372 कोटी इतका अंदाजित प्रकल्प खर्च आहे. “नवीन पूल बांधणे” या लेखाशिर्षांतर्गत रक्कम रु. 64.50 कोटी तरतूद करण्यात आली आहे.
सायन्स पार्क :- नेरुळ से-19 ए मध्ये वंडर्स पार्क येथील 8.50 एकर क्षेत्रात अभिनव स्वरुपात सायन्स पार्क उभारण्यात येत आहे. सद्यस्थितीत सायन्स पार्कचे काम प्रगतीपथावर असून दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरु आहे. सायन्स पार्कचे संपूर्ण आरसीसी बांधकाम जुलै 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून त्यासोबतच अंतर्गत सजावट व विज्ञान प्रकल्पाचे काम जागतिक तज्ज्ञ सल्लागारांचे सहकार्य घेऊन करण्याचे प्रस्तावित आहे. सदर प्रकल्पाकरिता रु. 123.00 कोटी इतका खर्च अपेक्षित असून याकरिता भरीव तरतूद करण्यात आली आहे.
पथसंकेत :- पाम बीच मार्गावरील पथसंकेत करणे, नमुंमपा क्षेत्रातील पथसंकेत करणे तसेच विविध ठिकाणी पथसंकेत उभारणेची कामे प्रस्तावित असून सदर लेखाशिर्षांतर्गत रक्कम रु. 7.40 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.
क्रीडासंकुल व मैदाने :- घणसोली से. 13 मधील भूखंड क्र. 1 येथे क्रीडासंकुल बांधणे प्रस्तावित असून सदर कामांकरिता क्रीडासंकुल बांधणे लेखाशिर्षांतर्गत तरतूद करण्यात आली आहे. तसेच ऐरोली, सानपाडा, सीबीडी, घणसोली व वाशी या विविध नोडमध्ये मैदाने विकसीत करणेसाठी रक्कम रु.19.30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
नवी मुंबई शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे नवीन जलस्त्रोत निर्माण करण्यासाठी या अंदाजपत्रकात एकूण रक्कम रु. 114.36 कोटी एवढ्या रक्कमेची तरतूद केली आहे.
पर्यावरण :- पर्यावरण ग्रीन हाऊसिंग कन्सेप्ट, सोलार हिटर, वॉटर रि-सायकलिंग - नवी मुंबई शहरातील शुध्द हवेच्या गुणवत्तेची मानके राष्ट्रीय विहीत मर्यादेत आणण्याकरिता राबविण्यात येणा-या राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रम अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेस रु. 5.85 कोटी निधी उपलब्ध झालेला आहे.
आरोग्य विभाग :- नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 3 सार्वजनिक रुग्णालये, 3 माता बाल रुग्णालये, 23 नागरी आरोग्य केंद्रे व 1 फिरता दवाखाना अशा आरोग्य सुविधा नागरिकांकरिता उपलब्ध केलेल्या आहेत. महानगरपालिकेच्या सार्वजनिक रुग्णालय नेरुळ व ऐरोली येथील रुग्णखाटांची क्षमता प्रत्येकी 150 होती त्यात वाढ करण्यात आलेली असून आता ती अनुक्रमे 280 व 200 इतकी वाढविण्यात आलेली आहे. त्यासोबतच खाटांच्या अनुषंगाने त्यासाठी आवश्यक असणारी वैदयकीय सेवा व वैदयकीय उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
सन 2023-2024 मधील नियोजित उपक्रम :-
- नेरुळ व ऐरोली येथे शीघ्र हस्तक्षेप केंद्र स्थापन करणे:- तरतूद: रु. 3.12 कोटी
- (दिव्यांग काळजी केंद्र) नेरुळ व बेलापूर येथे दिव्यांग काळजी केंद्र स्थापन करणे :- तरतूद : रु. 2.87 कोटी
बहुउद्देशीय इमारत विनियोग :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, जुईपाडा, कोपरखैरणे, ऐरोली या 5 ठिकाणी वातानुकुलीत व बिगर वातानुकुलीत सुविधा असलेल्या बहुउद्देशीय इमारतींमध्ये सभागृहे उपलब्ध करुन देण्यात येतात. सदर इमारतींची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थापन याकरिता रु.5.00 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
क्रीडा व सांस्कृतिक विभाग :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील क्रीडापटू व कलावंतांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरिता महापौर चषकांतर्गत विविध क्रीडा व कला प्रकार, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी रक्कम रु.200.00 लक्ष तरतूद करण्यात आलेली आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांना जिल्हयाचा दर्जा प्राप्त झाल्याने क्रीडा विभागाच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे निश्चित केलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी रक्कम रु.30.00 लक्ष तरतूद करण्यात आलेली आहे.
शहरातील विविध विभागात क्रिकेट, ॲथेलेटिक्स, टेबल टेनिस, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, बॅडमिंटन, स्विमींग आणि व्हॉलीबॉल इ. खेळांची महानगरपालिकेमार्फत सर्व सुविधा असलेली प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये मल्लखांबसारख्या पूर्णत: देशी खेळाचा नव्याने समावेश करण्यात येत आहे. याकरिता रु.80.00 लक्ष तरतूद करण्यात आलेली आहे.
शासकीय शालेय जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडूंबरोबरच नव्याने जिल्हा व राज्यस्तरावरील प्राविण्यप्राप्त खेळाडूंनासुध्दा क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या प्रस्तावास मा.सर्वसाधारण सभेने मंजूरी दिलेली असून त्यानुसार कार्यवाही सुरु आहे. क्रीडा शिष्यवृत्तीकरिता रु. 150.00 लक्षची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.
शासनाने निर्देशित केलेनुसार उदयोन्मुख व होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्दात्त हेतूने कबड्डी, खो-खो व शुटिंगबॉल या खेळाचे खेळाडू दत्तक घेऊन व्यावसायिक संघ तयार करण्यात आलेले आहेत. याकरिता रु.100.00 लक्षची तरतूद करण्यात आलेली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai