पालिकेचे राजमाता जिजाऊ रुग्णालय नवजात बालकांसाठी वरदान
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 21, 2023
- 387
नवी मुंबई ः महापालिकेची वाशी, नेरुळ व ऐरोली ही सार्वजनिक रुग्णालये सर्वसामान्यांसाठी आरोग्य दिलासा ठरत आहेत. त्यातही राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली येथील अद्ययावत असा नवजात शिशू विभाग हा नवजात बालकांसाठी वरदानच ठरला आहे. मागील तीन वर्षात येथे 1053 प्रसूती झाल्या आहेत. यामध्ये सर्वात कमी वजनाचे व सर्वात जास्त वजनाचे बाळ सुखरुप उपचार घेवून घरी परतले आहेत.नवजात शिशू विभागातील मृत्यूदर 5 टक्केपेक्षा कमी असणे ही कामगिरी प्रशंसनीय आहे. तसेच परवडणारे तसेच अद्ययावत उपचार पद्धती असल्याने हे रुग्णालय नवजात बालकांसाठी वरदान ठरत आहे.
3 सप्टेंबर 2019 रोजी 12 बेड्स व्यवस्थेचा नवजात शिशू विभाग ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयात सुरु झाला. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा राठोड यांच्यासह बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल देशमुख व डॉ. सचिन बिरादार यांनी नवजात शिशू विभाग कसा असावा याचे सूक्ष्म नियोजन केले. गरोदर मातांना प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात गुणात्मक उत्तम सेवा देणे हे ध्येय नजरेसमोर ठेवून कामाला सुरुवात करण्यात आली. मागील 3 वर्षे 3 महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच 3 सप्टेंबर 2019 पासून 31 डिसेंबर 2022 पर्यंत याठिकाणी 1053 प्रसूती झाल्या असून याठिकाणी सर्वात कमी वजनाचे व कमी दिवसांचे प्रिमॅच्युअर बाळ हे 26 आठवड्यांमध्ये जन्मलेले 750 ग्रॅम वजन असलेले होते. हे बाळ एनआयसीयूमध्ये 73 दिवस होते. त्यावर सुयोग्य उपचार केल्यामुळे या बाळाची सर्व वाढ व विकास योग्यरितीने झाला असून हे बाळ आज 3 वर्षांचे झाले आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयात एक तिळेही जन्माला आले असून ही तिळी 31 आठवड्यांमध्ये जन्मली होती. यापैकी 2 नंबरच्या बाळाला पिन्युमोथोरॅक्स हा गंभीर आजार झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यावरही नवजात शिशू विभागाच्या वैद्यकीय समुहाने शल्य चिकित्सक डॉ. सागर होटकर यांच्या मार्गदर्शनानुसार योग्यरित्या उपचार केला व ही तिन्ही बाळे 49 दिवस एनआयसीयू मध्ये उपचार घेऊन सुखरूप घरी गेली. या रुग्णालयात आत्तापर्यंतच्या कालावधीत सर्वात जास्त 4.55 कि.ग्रॅ.वजनाचे बाळ जन्मले होते. या बाळावर अत्याधुनिक पध्दतीने काळजीपूर्वक उपचार करण्यात आले व हे बाळही सुखरूप घरी गेले. याठिकाणाहून एमआयएससी एन यासारखा गंभीर आजार असलेली 7 बालकेही व्यवस्थित उपचार घेऊन घरी गेली आहेत.
- मृत्यू दर 4.84 टक्के
रुग्णालयाच्या एनआयसीयू विभागात मागील 3 वर्षात 1053 नवजात शिशूंपैकी केवळ 51 अतिगंभीर परिस्थितीतील नवजात शिशू दगावले असून या विभागातील मृत्यू दर 4.84 टक्के इतका कमी आहे. नवजात शिशू विभागातील मृत्यूदर 5 टक्केपेक्षा कमी असणे ही कामगिरी प्रशंसनीय मानली जाते. या सर्व यशोगाथा प्रातिनिधीक स्वरुपातील असून अशी बरीच उल्लेखनीय कामे ऐरोली रुग्णालयाच्या नवजात शिशू विभागामार्फत कऱण्यात आलेली आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai