एप्रिल अखेरपर्यंत सर्व मार्केट कार्यान्वित करा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 28, 2023
- 479
सुविधा कामांना गती देण्याचे आयुक्तांचे निर्देश
नवी मुंबई ः महपालिकेमार्फत विविध विभागांमध्ये बांधण्यात आलेल्या मार्केटच्या वास्तू वापरात आणण्याच्या दृष्टीने नियोजनबध्द कार्यवाही करावी व एप्रिल महिना अखेरपर्यंत सर्व मार्केट कार्यान्वित होतील याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले. तसेच प्रत्येक विभागातील सुविधा कामांना गती देण्याच्या सूचना केल्या.
सर्व विभागांच्या साप्ताहिक आढावा बैठकीप्रसंगी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रत्येक विभागातील सुरु असलेल्या कामांचा तसेच नियोजित कामांचा सविस्तर आढावा घेतला आणि कामांची सद्यस्थिती जाणून घेत गतीमान कार्यवाहीचे निर्देश दिले. बेलापूर, नेरूळ, कोपरखैरणे, सानपाडा, ऐरोली विभागांमध्ये मार्केटची बांधकामे पूर्ण झाली असून त्यापैकी अनेक मार्केटच्या वास्तू अभियांत्रिकी विभागाकडून मालमत्ता विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत. या प्रत्येक वास्तूच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेत आयुक्तांनी ते मार्केट कार्यान्वित होण्याकरिता वास्तुनिहाय कार्यवाहीचे आदेश दिले. पालिकेच्या परवानाधारक विक्रेत्यांना प्राधान्याने संधी देऊन जागा वाटप करण्याचे निर्देशित करतानाच ज्या मार्केटच्या जागांमध्ये परवानाधारक फेरीवाले नाहीत त्याविषयीची कार्यवाही नियमानुसार संबंधीत विभाग कार्यालयामार्फत करून घेण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले.
वाशी येथील मंगल कार्यालय इमारत लवकरात लवकर नागरिकांच्या वापरात येण्याच्या दृष्टीने कार्यालयीन कार्यवाहीला गती देण्याचे सूचित करतानाच आयुक्तांनी रात्रनिवारा केंद्र वापरात येण्याच्या दृष्टीने निविदा प्रक्रिया तत्परतेने करण्याचे समाजविकास विभागाला सूचित केले. स्वच्छतेच्या दृष्टीने शहरामध्ये असलेल्या मोकळ्या भूखंडांची पाहणी विभाग कार्यालयांमार्फत करण्यात येऊन पुढील बैठकीत त्याचा तपशिलवार आढावा सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दोन्ही परिमंडळांना दिले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात होर्डींग धोरणानुसार मोठे होर्डींग लावण्यात आलेले आहेत. त्यावर अनेक ठिकाणी एलईडी लावलेले आढळून येतात. त्या अनुषंगाने जाहिरात धोरण व कार्यप्रणाली पुन्हा एकदा तपासून घ्यावी असे निर्देश परवाना विभागास दिले. सर्व विभाग कार्यालयांनी आपापल्या क्षेत्रातील महिला शौचालयांमध्ये लावलेल्या सॅनिटरी पॅड्स मशीन्सची सद्यस्थिती स्वच्छता निरीक्षकांमार्फत तपासून घ्यावी व त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देशित करतानाच आयुक्तांनी त्या मशीन्स नियमित कार्यान्वित राहतील अशाप्रकारची कार्यप्रणाली आखण्याचे निर्देश दिले. केंद्र शासनाच्या ‘महिला आयकॉन्स लिडींग स्वच्छता (विन्स) पुरस्कार 2023च्या धर्तीवर पालिकेने जाहीर केलेल्या “स्वच्छोत्सव-2023“ हा अभिनव उपक्रम जाहीर केला असून या पुरस्कार प्रणालीची जास्तीत जास्त प्रसिध्दी करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. शिष्यवृत्ती प्रक्रियेतील अडचणी दूर करून लवकरात लवकर शिष्यवृत्तीची रक्कम बँक खात्यात जमा होण्याच्या दृष्टीने कार्यवाहीला गती देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत झालेल्या चर्चेच्या व दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने विहित वेळेत कार्यवाही करण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले.
- मैदान व सभागृहाच्या अनामत रक्कम वाढणार
सार्वजनिक मैदानात कार्यक्रम केल्यानंतर आयोजक संस्था तेथील स्वच्छतेकडे पुरेसे लक्ष देत नाही व मैदान कार्यक्रमासाठी भाड्याने घेण्याची अनामत रक्कम अल्प असल्याने ती जप्त झाली तरी चालेल असे गृहीत धरून मैदाने तशीच अस्वच्छ ठेवतात. आयोजक संस्थेला स्वच्छतेचे महत्व कळावे आणि शहरातील स्वच्छता अबाधीत रहावी यादृष्टीने मैदान वापराच्या अनामत रक्कमेत वाढ करण्याबाबत प्रक्रिया सुरु करावी असे सूचित केले. अशाच प्रकारे पालिकेची मंगल कार्यालये, समाजमंदिरे विविध कार्यक्रमांसाठी भाड्याने घेतली जातात. तेथेही आयोजक अस्वच्छ सभागृह ठेवून निघून जातात. त्याचप्रमाणे सभागृहातील विज वापराबाबतही निष्काळजीपणा दाखविला जातो. या सर्व बाबी लक्षात घेता वीज देयकासाठीची अनामत रक्कम व सभागृह वापराबाबतची अनामत रक्कम वेगवेगळ्या घ्याव्यात याविषयी देखील विचार विनिमय करण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai