नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठेत खरेदीचा उत्साह
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 13, 2023
- 369
खरेदीसाठी गर्दी : बाजारात पूजेचे साहित्य, दागिने, कपड्यांची मोठी आवक
नवी मुंबई : गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. उद्या म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी नवरात्रारंभ घटस्थापना होणार असुन विजयादशमीपर्यंत हा उत्साह पाहता येणार आहे. देवीच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु असून बाजारही विविध वस्तूंनी सजला आहे. खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साह पाहावयास मिळत आहे. देवीच्या पूजेचे साहित्य तसेच कपडे, सजावटीच्या साहित्यांची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. आकर्षक रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे.
अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होते.शहरात घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमार्फत अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तीचे तसेच प्रतिमेचे पूजन केले जाते. घटस्थापना झाल्यानंतर नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची मोठ्या भक्तीभावाने आराधना होत असते. या कालावधीत नवरात्रीमध्ये बाजारात मोठी उलाढाल होते. 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असून त्या निमीत्ताने दोन दिवस आधीच सर्वत्र खरेदीची धामधूम सुरू आहे. बाजारात दाखल झालेल्या देवीच्या पूजेचे साहित्य, दांडिया, नवनवीन कपडे, दागिन्यांनी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुंदर नक्षीकाम केलेले आकर्षक घागरे, चनिया-चोली, साड्या, कवड्या, काचा, मणी यांचा वापर करून तयार केलेल्या दागिन्यांनी बाजार फुलले आहेत. बाजारात शोभेच्या काचा आणि मोत्यांनी सजवलेले घट दिसू लागले असून, वर्क केलेली घागरा-चोली, कुर्ता-पायजमा, बांधणी ड्रेस-साड्या आणि त्यावर साजेल अशी आभूषणे, टोप्यांनी बाजारातले रंग वाढले आहेत.
सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी देवीच्या स्वागताची जंगी तयारी केली असून अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तीचे आगमनही झाले आहे. या ठिकाणांवर गरब्याचे आयोजन करण्यात येणार असल्याने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या भक्ती भावाने कार्यमग्न झालेले पाहावयास मिळत असून रस्त्यावरील होणाऱ्या आकर्षक रोषणाईने आसमंत उजळून निघाला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai