मोरबे धरणात 85 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा
- by Aajchi Navi Mumbai
- May 13, 2026
- 28
पाण्याचा जपून वापर करण्याचे आयुक्तांचे आवाहन
नवी मुंबई ः ‘एल-निनो’ या जागतिक हवामान बदलामुळे पाऊस उशीरा सुरू होणार असून त्याचे प्रमाणही कमी असणार आहे. यापार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण प्रकल्पस्थळी पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी भेट देऊन जलसाठ्याची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली. मोरबे धरण क्षेत्रात अजून 85 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा असून उशीरा येणाऱ्या पावसाच्या अंदाजानुसार नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन आयुक्तांनी केले.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी ‘एल-निनो’ या जागतिक हवामान बदलामुळे भारतातील मोसमी वाऱ्यावर परिणाम होऊन सरासरी पावसाचे प्रमाण 92% ते 94% इतके राहणार आहे तसेच पावसालाही उशीर सुरू होणार असल्याचे अंदाज नुकतेच वर्तविण्यात आले आहेत. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी मोरबे धरण प्रकल्पस्थळी भेट देऊन जलसाठ्याची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली त्यासोबतच जलाशयाच्या दोन्ही बाजूने संपूर्ण परिसराची पाहणी करीत जमिनीची मोजणी व सीमांकन निश्चित करून आवश्यक त्या ठिकाणी तत्परतेने कुंपण घालण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, मालमत्ता विभागाचे उपआयुक्त भागवत डोईफोडे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त संजय शिंदे, उद्यान विभाग उपआयुक्त स्मिता काळे, कार्यकारी अभियंता संतोष उनवणे आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मोरबे धरण क्षेत्रात अजून 85 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा असून हवामानखात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पर्जन्यमान नेहमीपेक्षा 6 ते 8 टक्के कमी असेल आणि पाऊस उशीरा सुरू होईल ही परिस्थिती लक्षात घेता नवी मुंबईकर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन आयुक्तांनी केले. त्याचप्रमाणे पावसाच्या स्थितीचा विचार करून महापालिका पदाधिकारी यांचेशी चर्चा केल्यानंतर पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत निर्णय घ्यावे लागतील असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी धरण क्षेत्राच्या एका बाजूने आंबेवाडीपर्यंत 7.5 किमी तसेच दुसऱ्या बाजूने पिरकटवाडी, उंबरणेवाडी पर्यंत 11 किमी अशी धरणाच्या दोन्ही बाजूने क्षेत्रपाहणी केली. यावेळी धरण क्षेत्राच्या बाहेर, लगतच्या भागात आढळलेल्या काही खाजगी बांधकामांच्या अनुषंगाने हद्द तपासणी करावी असे त्यांनी सूचित केले. त्याप्रमाणे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मोजणीचे काम तातडीने करून घेण्याचे निर्देश दिले. त्यासोबतच आवश्यक त्या ठिकाणी कुंपण घालण्याच्याही सूचना आयुक्तांनी केल्या.
या परिसरातील वृक्षारोपणास योग्य भागात देशी वृक्षांची झाडे लावून पर्यावरण संवर्धनाची कार्यवाही करावी असे सूचित करतानाच आयुक्तांनी सभोवतालच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी असे निर्देश दिले. धरणाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या व त्यावेळी पुनर्वसनास नकार दिलेल्या पिरकटवाडी व 3 वाड्यांमधील कुटुंबांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने तपासणी करावी असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. मोरबे धरणातील पाणीसाठ्याच्या प्रत्यक्ष पाहणीप्रमाणेच मोरबे धरण क्षेत्राच्या कक्षेतील जमिनीचीही पाहणी करीत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी ही जमीन संरक्षित करण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai