नवी मुंबईत महिलांसाठी मंगळागौर स्पर्धा
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 06, 2026
- 27
15 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतर्फे महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून, त्याअंतर्गत पारंपरिक मंगळागौर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला समूहांनी 15 ऑगस्ट 2026 पर्यंत आपले अर्ज संबंधित विभाग कार्यालयात किंवा समाजविकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन, येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सलुजा सुतार यांनी केले आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी 20 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजता महात्मा फुले स्मृती भवन, सेक्टर-3, वाशी येथे होणार आहे. अर्ज दाखल केलेल्या स्पर्धकांना याबाबतची माहिती दूरध्वनीद्वारे देण्यात येणार आहे. याशिवाय महिला बचतगट व महिला संघटनांसाठी ‘गटांच्या माध्यमातून सक्षमीकरण’ या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. ही स्पर्धा केवळ महिलांसाठी खुली असून प्रत्येक संघात किमान 10 आणि कमाल 15 महिला सदस्य असणे आवश्यक आहे. एका महिलेला फक्त एका समूहातूनच सहभाग घेता येणार असून, अंतिम मुदतीपूर्वी नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे. स्पर्धेतील सादरीकरणाचा कालावधी 8 ते 10 मिनिटांचा असेल. निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ घेतल्यास गुण कपात केली जाईल. मंगळागौरीची पारंपरिक संस्कृती, लोकनृत्य आणि पारंपरिक खेळांचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या संघांना प्राधान्य दिले जाईल. विशेषतः झिम्मा, फुगडी, गोफ, टिपऱ्या यांसारख्या पारंपरिक खेळांचा समावेश आणि पारंपरिकतेबरोबरच नावीन्यपूर्ण सादरीकरणाला अधिक गुण दिले जाणार आहेत. परीक्षण करताना पारंपरिकता, सांस्कृतिक सादरीकरण, नृत्यकौशल्य, तालबद्धता, सर्जनशीलता, अभिनय, वेशभूषा, संघातील समन्वय आणि एकूण मंचावरील सादरीकरण या निकषांचा विचार केला जाणार आहे. स्पर्धकांनी सादरीकरणासाठी आवश्यक संगीत किंवा ऑडिओ ट्रॅक स्वतः उपलब्ध करून स्पर्धेपूर्वी आयोजकांकडे जमा करणे आवश्यक आहे. संगीतामध्ये अश्लील किंवा सांस्कृतिक मूल्यांना बाधा पोहोचविणारे शब्द अथवा आशय नसावा, अशी अटही घालण्यात आली आहे. स्पर्धकांची वेशभूषा महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीची असावी. महिलांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, महिला मंडळे, संस्था, बचतगट आणि विविध महिला समूहांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर सुजाता सुरज पाटील यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai