कुळ कायद्यांतर्गत मंजूर प्रकरणांची चौकशी
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 21, 2026
- 22
महसूलमंत्र्यांचे आदेश
पुणे : नियमांचे उल्लंघन करून काही शेतजमिनींवर परस्पर कुळांची नावे लावण्यात आल्याच्या तक्रारींची महसूल विभागाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत रायगड जिल्हा अग्रेसर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे महसूलमंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राज्यात आतापर्यंत कुळकायद्यांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व तहसीलदारांकडून परस्पर कुळांची नावे लावण्यात आलेल्या प्रकरणांची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित तलाठी व त्यास मंजुरी देणाऱ्या तहसीलदारांचे धाबे दणाणले आहेत.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच राज्यातील सर्व अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात कुळकायद्यांतर्गत मंजूर प्रकरणांच्या चौकशीचे निर्देश देण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. जमीनमालकांच्या संमतीशिवाय काही जमिनींवर परस्पर कुळांची नावे नोंदविण्यात आल्याच्या तक्रारी महसूलमंत्र्यांकडे करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम, 1948 मधील तरतुदींनुसार जमीनमालक आणि जमीन कसणारा यांच्यात करार झाल्यास संबंधित जमिनीला कुळकायदा लागू होतो. कुळाच्या जमिनीची विक्री करायची असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असते. तसेच शासनाने निश्चित केलेला नजराणा जमा केल्यानंतर संबंधितांना जमिनीचा मालकीहक्क प्राप्त होतो. परंतु, याबाबत कोणतीही प्रक्रियेचे पालन न करता अनेक तलाठ्यांनी परस्पर कुळांची नावे सातबाऱ्यावर चढवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कायद्यातील तरतुदींचा गैरवापर करून काही जमिनींवर नियमबाह्य पद्धतीने कुळांची नावे लावण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. याबाबत संबंधित जमीनमालकांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांची दखल घेत राज्यातील कुळकायद्यांतर्गत मान्यता मिळालेल्या सर्व प्रस्तावांची तपासणी केली जाणार आहे. चौकशीत गैरप्रकार आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महसूलमंत्र्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आता राज्यव्यापी तपासणीमुळे कुळकायद्याचा गैरवापर करून करण्यात आलेले आणखी गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- तहसीलदारांकडून मागविला तपशील
कुळकायद्यांतर्गत मंजूर प्रकरणांची संख्या, जमीनमालक आणि कुळ म्हणून नोंद झालेल्या व्यक्तींची माहिती, मंजुरीची प्रक्रिया तसेच त्यासाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रे आदी तपशील तहसीलदारांकडून मागविण्यात आला आहे. या कागदपत्रांची छाननी करून नियमबाह्य प्रकरणे शोधली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai