बाल वैज्ञानिक परिषदेत पालिकेचे विद्यार्थी चमकले
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 20, 2023
- 270
अभिनव प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड
नवी मुंबई ः भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 31 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या नाशिक येथे पार पडलेल्या राज्य पातळीवरील फेरीत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 46 गोठीवली येथील पल्लवी सोळंखे व प्रिती चिन्हा राठोड या दोन विद्यार्थिनींनी सादर केलेल्या अभिनव प्रकल्पाची निवड पुढील राष्ट्रीय पातळीवर झाली आहे. या त्यांच्या भरारीमुळे नवी मुंबई महापालिकेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नाममुद्रा देश पातळीवर उमटली असून पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद 2023 या स्पर्धेत 4500 हून अधिक विज्ञान प्रयोगांचा सहभाग असून यामध्ये 36 जिल्हे सहभागी झाले. जिल्हास्तरीय फेरीतील 188 प्रकल्पांची निवड होऊन त्यापैकी 52 प्रकल्पांची राज्यस्तरीय फेरीमध्ये निवड झालेली आहे. त्यापैकी 30 प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. जिज्ञासा ट्रस्ट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ठाणे येथील सुलोचना देवी संघानिया स्कुल याठिकाणी राष्ट्रीय पातळीवर निवडलेल्या 30 प्रकल्पांचे पत्रकार परिषदेप्रसंगी सादरीकरण करण्यात आले. तेथे सर्वोत्तम 10 प्रकल्पांमध्ये या आगळया वेगळया प्रकल्पाची नोंद झाली असून विल्हेवाट लावता येणारे महिलांचे लघवीचे साधन या नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या अभिनव प्रकल्पाची निवड पुढील राष्ट्रीय पातळीवर झालेली आहे.
प्रसाधनगृहात विशेषत्वाने महिलांना जाणवणाऱ्या अडचणी व त्यामुळे होणारा त्रास याबाबत उपाय शोधण्याच्या दृष्टीने दोन विद्यार्थिनींनी विज्ञानाची कास धरत केलेला विचार व शोधलेला उपाय ही त्यांच्यामधील कल्पकता आणि शास्त्रीय दृष्टीकोन दाखविणारी गोष्ट असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे तसेच राज्य समन्वयक विश्वास कोरडे यांनीही या विद्यार्थिनींच्या अडचणीतून शास्त्रीयदृष्ट्या मार्ग काढण्याच्या कल्पकतेची प्रशंसा केली. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे उपआयुक्त योगेश कडुसकर तसेच शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांनीही विद्यार्थिनींचे कौतुक करुन अभिनंदन केले. नमुंमपा शाळा क्रमांक 46 गोठीवली या शाळेतील विद्यार्थिनींनी शाळेच्या मुख्याध्यापक तसेच शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना गोसावी, मुख्याध्यापक रघुनाथ शेलार, पंडीत लर्निंग लिंक्स फाऊंडेशन स्टीम लॅबच्या मार्गदर्शक स्नेहल पोदार तसेच वर्गशिक्षक वासंती पाटील आणि शिक्षकवृंदाचे त्यांना मार्गदर्शन लाभले. याच शाळेच्या अंश शर्मा व विराज गुरव या दोन विद्यार्थ्यांनीही 51 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात आजोबांची आधुनिक काठी हा प्रकल्प सादर करुन आपल्या कल्पकतेचे दर्शन घडविले आहे. या प्रकल्पाची तालुका स्तरावरुन ठाणे जिल्हा स्तरावर निवड झाली असून त्यांनीही आपल्या प्रकल्पाची माहिती आयुक्त महोदय व इतर मान्यवरांना दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai