मालमत्ता करांच्या नोटीसींचा मुद्दा ऐरणीवर
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 16, 2024
- 382
लिडार सर्वेक्षणानुसार नोटिसांबाबत प्रशासन ठाम
नवी मुंबई : शहरातील सर्व मालमत्तांचे लिडार सर्वेक्षण महापालिकेच्या वतीने केले जात आहे. या सर्वेक्षणानुसार जवळजवळ दहा हजार नागरिकांना नोटिसा पाठवल्या आहेत. याबाबत वाद होण्याची चिन्हे आहेत. नवी मुंबई महापालिका प्रशासन नोटिसा पाठविण्याबाबत ठाम असून भाजपचे नेते गणेश नाईक आणि खासदार राजन विचारे या दोघांनीही यास विरोध केला आहे.
दहा चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम केलेल्या तसेच वापर बदल करून ‘आगे दुकान पिछे मकान' असे चित्र असलेल्या जवळजवळ 10 हजार नागरिकांना नोटीसा पाठवल्या असून याबाबत आमदार गणेश नाईकांनी शासनाकडे 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करसवलतीचा प्रस्ताव प्रलंबित असताना या नोटिसा थांबवाव्यात अशी मागणी केली तर पालिकेत लोकप्रतिनिधी नियुक्तीपर्यंत करपात्र मूल्य आकारणी स्थगित करण्याची मागणी राजन विचारे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. नागरिकांना पालिका आयुक्तांच्या परवानगीने मालमत्ता कराबाबतच्या विशेष लेखी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालिका क्षेत्रातील बेलापूर ते दिघापर्यंतच्या सर्वच सिडको नोडमध्ये नोटीसा पाठवण्यास सुरुवात झाली असून लोकसभा निवडणुकीत याबाबत अधिक वादंग होण्याची व यावरुन आरोप-प्रत्यारोपांचा डाव रंगणार असे चित्र आहे.
पालिकेने संबंधित कंपनीकडून लिडार सर्वेक्षणासाठी एमआयडीसी क्षेत्रासह विविध उपनगरातील भागाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सध्या फक्त गावठाण विभागातील सर्वेक्षण अद्याप पूर्ण करण्यात आले नाही. परंतु बेलापूर ते अगदी संपूर्ण नवी मुंबई पालिकाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सिडकोनिर्मित घरे यांच्यात वापर बदल केला आहे. नेरुळ, बेलापूर, वाशी, कोपरखैरणेसह संपूर्ण सिडको नोडमध्येच वापर बदलाची तसेच 10 चौमीटरपेक्षा वाढीव बांधकामाची हजारो प्रकरणे असून लिडारच्या सर्वेक्षणानुसार पालिकेने नोटीस पाठवल्या आहेत. आगामी काळात मोठ्या प्रमाणात या नोटीस नागरीकांना प्राप्त होणार असून नागरिकांना मालमत्ता करात मोठा बदल दिसून येत आहे. पालिकेने पाठवलेल्या विशेष लेखी नोटीसमध्ये 21 दिवसांच्या आत नागरीकांना हरकत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मालमत्ता करांच्या नोटीसींचा मुद्दा ऐरणीवर येणार आहे. नेरुळ, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, वाशी, तुर्भे येथे सिडकोने बांधलेल्या बैठ्या घरांचे रुपांतर तीन ते पाच मजली इमारतीत झालेले आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या रहिवाशी इमारतीत विनापरवाना वाणिज्य वापर केला जात असून त्यावर नियमानुसार कर आकारणी होत नव्हती ती आता लिडार सर्वेक्षणामुळे कराच्या कक्षेत आल्या आहेत. त्यावरुन आता पालिका प्रशासन व नेतेमंडळी यांच्यात कलगीतुरा रंगणार आहे.
लिडार सर्वेक्षणात प्रत्यक्षात आढळलेल्या क्षेत्रफळावर कर आकारणी केली जात आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरुच राहणार आहे. मालमत्ताबाबतच्या वापर बदल तसेच वाढीव बांधकाम यांच्यानुसार नियमानुसार नोटीस काढण्यात आलेल्या आहेत. त्या थाबवण्याचा प्रश्नच येत नाही. -राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai