सिडकोचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज
- by Aajchi Navi Mumbai
- May 31, 2024
- 423
नवी मुंबई ः सिडको महामंडळाचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष 1 जून ते 30 सप्टेंबर 2024 या पावसाळी कालावधीमध्ये चोवीस तास कार्यरत असणार आहे. दरवर्षी पावसाळी कालावधीमध्ये सिडकोतर्फे नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील नागरिकांकरिता आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येतो. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्ती/दुर्घटना लक्षात घेता जून ते सप्टेंबर या कालावधीत सिडकोचा सुसज्ज असा आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यरत असतो.
सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन इमारतीच्या तळ मजल्यावर असलेला हा नियंत्रण कक्ष कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसहित शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही 24 तास कार्यरत राहणार आहे. या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, उद्यान विभाग आदी महत्त्वाच्या विभागाचे कर्मचारी 24 तास संपर्कात असतील. सिडकोच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाद्वारे वृक्षांची पडझड/वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी, रस्त्यावरील उघड्या गटारांची झाकणे पूर्ववत बसवणे, पूर/पूरसदृश परिस्थिती, रस्त्यांवरील खड्डे, रस्ते वा नाल्याजवळ साचलेला कचरा, व्यक्तींचे पाणीसाठ्याच्या ठिकाणी बुडणे, आग व आगीचे विविध प्रकार, साथीचे रोग, विषारी प्राणी चावण्यासंबंधी बाबी, इमारत कोसळणे, भूस्खलन, पाणी साचणे या आपत्तींची दखल घेण्यात येऊन त्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येईल.
सिडकोतर्फे खारघर, पनवेल (पू.), पनवेल (प.), कळंबोली, नावडे, काळुंद्रे, तळोजा आणि कामोठे नोडचे हस्तांतरण पनवेल महानगरपालिकेला करण्यात आले असून या परिसरातील पावसाळी कामांसहित पायाभूत सुविधांच्या देखभालीसह आपत्ती व्यवस्थापनासंबंधी पनवेल महानगरपालिकेस माहिती द्यावी किंवा त्याबाबतची तक्रार नोंदवावी. नागरिकांमार्फत फोनवरून अथवा व्हॉट्स ॲपवरून माहिती अथवा तक्रार प्राप्त झाल्यावर नियंत्रण कक्षातील अधिकारी तातडीने निर्णय घेऊन ज्या नोडमध्ये सदर घटना घडली असेल तेथील प्रमुख अधिकाऱ्यास घटनेसंबंधी माहिती कळवतील व त्यासंबंधी योग्य ते मार्गदर्शन करतील. तसेच नियंत्रण कक्ष आवश्यक असलेल्या अग्निशमन केंद्र, हॉस्पिटल, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस अशा संबंधित विभागाशी तातडीने संपर्क साधून घटनास्थळी आवश्यक ती मदत ताबडतोब पोहोचविण्याची दक्षता घेईल. नागरी संरक्षण दल तसेच सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक यांचेही सहकार्य याकामी घेण्यात येणार आहे. नोडल अधिकारी, सर्व संबंधित सिडकोचे विभाग, तसेच इतर शासकीय विभाग यांच्याशी समन्वय साधण्याची महत्वाची भूमिका हा नियंत्रण कक्ष पार पाडेल. त्या घटनेसंबंधी केलेल्या कारवाईची माहिती व सद्यस्थिती नोडल अधिकारी नियंत्रण कक्षास पुरवणार आहेत. सदर माहिती नियंत्रण कक्षाकडून संपर्क साधलेल्या नागरिकांना दिली जाईल. याशिवाय धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे व अतिवृष्टीच्या वेळी पाणी साठल्यास पाण्याचा उपसा करणारी यंत्रसामुग्री 24 तास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दूरध्वनी अथवा व्हॉटसॲप क्रमांकावर
दूरध्वनी क्र. 022-67918383 / 8384 / 8385, 022-27562999
व्हॉटसॲप क्र. 8655683238
फॅक्स क्र. 022-67918199
ई-मेल शेलऽलळवलेळपवळर.लेा
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai