फ्लेमिंगोंच्या अधिवास संरक्षणासाठी समिती नेमणार
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 06, 2024
- 331
समितीने दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
मुंबई : कांदळवने ही फ्लेमिंगोंचे (रोहित पक्षी) अधिवास आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील फ्लेमिंगोंचे हे अधिवास संरक्षित करण्यासाठी तसेच आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी वन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीने दोन महिन्यांत याबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले जातील, अशी माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
सदस्य चेतन तुपे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला मंत्री मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे फ्लेमिंगोंचा अधिवास चांगला आहे. इराण, मध्य आशिया आदी ठिकाणांहून फ्लेमिंगो हजारो किलोमीटरचा प्रवास करुन या भागात येतात. येथील कांदळवने ही त्यांची अधिवास क्षेत्रे आहेत. कांदळवन हे फ्लेमिंगोंचे सुरक्षा कवच असल्याने ते जपले पाहिजे. त्यामुळे या क्षेत्राचे नुकसान करणाऱ्यांना आर्थिक दंडासोबतच शिक्षेची तरतूद करता येईल का, याचा विचार केला जाईल, अशी माहितीही मंत्री मुनगंटीवार यांनी दिली. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील हा अधिवास अधिक संरक्षित करण्यासाठी राज्याचे वन विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात येणाऱ्या समितीत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, सिडको, महानगरपालिकेचे अधिकारी, नगरविकास विभागाचे अधिकारी यांचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले.
कांदळवने जपण्यासाठी फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया मॅपिंग करत आहेत. त्यामुळे महसूल विभागाकडे असणारी ही जमीन वन विभागाकडे हस्तांतरित करण्याची विनंती केंद्र शासनाकडे करणार असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. दरम्यान, नेरुळ सीवूडस (नवी मुंबई) येथील डीपीएस तलावाजवळ सहा फ्लेमिंगो पक्ष्यांचा झालेल्या मृत्यूबाबत चौकशी करण्यात आली. यांचे शवविच्छेदन केले असता चार पक्ष्यांचा मृत्यू हा श्वसनक्रिया थांबल्याने झाल्याचे कारण समोर आहे. इतर दोन पक्ष्यांचे मृतदेह भग्नावस्थेत असल्याने त्याचे कारण समजू शकले नाही. अर्थात, तेथील स्थळ पाहणीनंतर अधिकाऱ्यांच्या पथकाने त्या तलावाशेजारील रस्त्यांवर असलेले एलईडी दिवे बदलून तिथे लो प्रेशर सोडियम दिवे अथवा पिवळ्या रंगांचे एलईडी दिवे बसविण्याची शिफारस केल्याची माहितीही मंत्री मुनगंटीवार यांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai