झोपु वरुन महायुतीत कलगीतुरा
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 26, 2024
- 450
नाईकांची आडकाठी असल्याचा चौगुलेंचा आरोप; उपोषणाचा इशारा
नवी मुंबई ः झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सप्टेंबर 2023 पासून सुरु केलेले सर्वेक्षण स्थानिक आमदार गणेश नाईक यांनी रोखल्याचा आरोप शिंदेसेनेचे नेते विजय चौगुले यांनी केला आहे. 31 जुलैपर्यंत झोपु योजनेवर तोडगा न निघाल्यास 1 ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. झोपु पुनर्विकास योजनेवरुन महायुतीच कलगीतुरा सुरु झाल्याने त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवी मुंबईत 28 ठिकाणी झोपडपट्टी परिसर असून त्यामध्ये 2001 च्या सर्वेक्षणानुसार 41 हजार झोपड्यांचा समावेश आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याची अमंलबजावणी करावी अशी मागणी विजय चौगुले यांनी शासनाकडे लावून धरली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याआधी तेथील संपुर्ण झोपडपट्टी क्षेत्राचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. 2001 पासून आजतागायत कोणतेही सर्वेक्षण महापालिकेमार्फत झाले नसल्याने त्याचा निश्चित आकडा नसल्याने हे सर्वेक्षण सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले होते. या सर्वेक्षणानंतर 1 जानेवारी 2000 पुर्वी अस्तित्वात असलेल्या झोपडीधारकांना मोफत तर जानेवारी 2011 पर्यंत अस्तित्वात असलेल्या झोपडीधारकांचे सशुल्क पुनर्वसन करण्याचे ठरवण्यात आले होते.
हे सर्वेक्षण आमदार गणेश नाईक यांच्या विरोधाने थांबवण्यात आल्याचा घणाघाती आरोप शिंदेसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेवून केला. नाईकांनी 10 वर्ष पालकमंत्री असताना झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत कोणतीही ठोस भुमिका घेतली नसल्याचे सांगितले. नाईक झोपडपट्टींचे पुनर्वसन शासनामार्फत करा असे सांगत असले तरी त्यांनी शहरात सुरु असलेल्या पुनर्विकासासाठी मात्र ही अट का घातली नाही असा सवाल करुन नाईकांची भुमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला आहे. राज्यात शिंदे-पवार-फडणवीस या तिघांच्या पक्षाचे महायुती सरकार असूनही त्यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे यावरुन दिसून येत आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना शिंदे सेनेने नाईकांना घेरण्याचा केलेला प्रयत्नांमुळे नवी मुंबईत महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
- लढाई आर्थिक कि राजकीय वर्चस्वासाठी?
दिघा, ऐरोली, घणसोली, तुर्भे, नेरुळ, बेलापुर या नोडमध्ये 28 ठिकाणी झोपडपट्ट्या अस्तित्वात आहेत. 2001 च्या सर्वेक्षणानुसार 41 हजार झोपड्या आहेत. पुनर्विकासाच्या माध्यमातून येथे शेकडो मोठे टॉवर्स उभे राहणार असून त्यामाध्यमातून लाखो कोटींची आर्थिक उलाढाल होणार आहे. त्याचबरोबर आगामी जनसर्वेक्षणानंतर नवी मुंबईत विधानसभेसाठी तीसरा मतदारसंघ बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक आणि राजकीय साम्राज्य स्थापनेसाठी ही पुनर्वसनापुर्वीच राजकीय लढाई सुरु झाल्याची चर्चा आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai