कांदळवनांवर राहणार तिसऱ्या डोळ्याची नजर
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 28, 2024
- 475
सीसीटीव्ही कॅमेरांसाठी निविदांची छाननी सुरू
मुंबई : कांदळवनाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे, तसेच काही ठिकाणी कांदळवनाची कत्तल करून गोदामे, इमारती उभ्या राहिल्या आहेत. भविष्यात हानी टाळण्यासाठी कांदळवन क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान, कांदळवन क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी काही संस्था पुढे आल्या असून कांदळवन कक्ष या संस्थांची पडताळणी करीत आहेत.
मुंबई महानगर क्षेत्र, रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक वनविभागाच्या ताब्यातील कांदळवन क्षेत्राचे सर्वेक्षण व पडताळणी करून एकूण 195 संवेदनशील ठिकाणी एकूण 669 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मान्यता मिळाली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी, तसेच रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरण येथील एकूण 195 कांदळवनातील संवेदनशील ठिकाणी एकूण 669 सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि पाच वर्ष देखभाल-दुरुस्तीसाठी 119.88 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या विनंतीनुसार हा प्रकल्प दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. दरम्यान, निविदा प्रसिद्ध केल्यानंतर काही संस्था पुढे आल्या आहेत. सध्या या संस्थांची पडताळणी सुरू असून संस्थेच्या नियुक्तीबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हा प्रस्ताव अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) मुंबई यांनी 18 जुलै रोजी शासनाकडे मान्यतेसाठी सादर केला आहे.
ठाणे खाडीत मोठे कांदळवन क्षेत्र आहे. त्यावर राडारोड्याचा भराव टाकून भूमाफियांकडून कांदळवने नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भिवंडी येथील कशेळी भागात खाडीकिनारी असलेल्या कांदळवनावर राडारोडा टाकून अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. दुर्लक्षामुळे येथील कांदळवन क्षेत्राची हानी सुरूच आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे कांदळवन क्षेत्राच्या परिसरावर सतत नजर ठेवता येईल. यामुळे कांदळवनात करण्यात येणारा भराव रोखला जाईल, तसेच भूमाफियांविरोधात कारवाई करणेही शक्य होईल. सीसीटीव्हीच्या माध्यमातून येथील कांदळवन क्षेत्रावर वन विभागाचेही लक्ष राहणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे कांदळवनाच्या संरक्षणाला खीळ बसली आहे. लवकरच कांदळवनांच्या क्षेत्रांना केंद्रिकृत नियंत्रण कक्षासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. भूमाफियांना पकडण्यासाठी जलद कृती दल तैनात करण्याचे सूचित करण्यात आले आहे. बी.एन.कुमार, संचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai