डीपीएस तलावाची स्वच्छता सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 13, 2026
- 25
मुख्य जलवाहिनीतून प्रवाह सुरु करण्याची मागणी
नवी मुंबई : नेरुळ येथील डीपीएस फ्लेमिंगो तलावात मँग्रोव्ह सेलने अतिरिक्त शेवाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. पूरस्थिती टाळण्यासाठी आणि पावसाळ्यापूर्वी तयारी म्हणून हे स्वच्छता अभियान राबवले जात आहे. मात्र तलावाच्या दक्षिण टोकावरील मुख्य जलवाहिनी अनेक वर्षांपासून बुजवलेली आहे, ती असल्याने सदरची सफाई अपुरी ठरु शकते, अशी चिंता पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही जलवाहिनी खुली करुन त्यातून पाण्याचा प्रवाह सुरु राहिल अशी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
डीपीएस तलाव हा फ्लेमिगोंच्या अधिवासासाठी उचित अशी जागा असून तीचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणप्रेमीं नेहमीच आग्रही असतात. येथे फ्लेमिंगो पक्षांना खाद्य आणि विश्रांतीसाठी जागा मिळते. त्यामुळे या तलावाचे आरोग्यही तेवढेच चांगले असले पाहिजे. मात्र डीपीएस तलावातील जलवाहिनी बुजवल्यामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह खंडीत झाला असून त्यामुळे पाणी साचणे आणि शैवाल वाढीस चालना मिळाल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सफाईचे स्वागत करताना ती केवळ तात्पुरती उपाययोजना ठरु नये, असे म्हटले आहे. पाण्याची गुणवत्ता, अन्नसाखळी आणि ज्वारीय प्रवाह बिघडल्यास पलेमिंगो त्वरित परिसर सोडतात, असे त्यांनी सांगितले. यंदा काही पलेमिंगो पक्षी केवळ पाहणीसाठी आले आणि लगेच परत गेले, हेच तलावाच्या खराब स्थितीचे संकेत असल्याचे कुमार म्हणाले.
सेव्ह फ्लेमिंगोज अँड मॅन्ग्रोव्हज फोरमच्या रेखा शंखला आणि कुमार यांनी सिडकोवर तीव्र टीका करत प्रवासी जलवाहतूक टर्मिनलच्या प्रवेश रस्त्यासाठी तलावाची मुख्य जलवाहिनी बुजवली गेल्याचा आरोप केला. त्यामुळे तलावाची नैसर्गिक नाडी बंद झाली असून, त्याचे गंभीर परिणाम दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व बंद असलेले ज्वारीय पाण्याचे मार्ग तातडीने खुले करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.
नवी मुंबई पर्यावरण संरक्षण संस्थाचे संदीप सरीन यांनी सांगितले की, डीपीएससारखे तलाव पलेमिंगोंचे दुसरे घर आहेत. सदर जलस्त्रोत दुर्लक्षित राहिल्यास जैवविविधतेवर गंभीर परिणाम होतो. एकंदरीतच तलावाची दीर्घकालीन पुनर्बांधणी ज्वारीय प्रवाह पुनर्स्थापित करणे, सातत्यपूर्ण देखभाल आणि वन विभागाकडे व्यवस्थापन सोपवण्यावर अवलंबून आहे, असे पर्यावरणवाद्यांनी स्पष्ट केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai