ठाणे-नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्गासाठी नेमणार सल्लागार
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 13, 2026
- 21
सिडकोने मागवली नियुक्तीसाठी निविदा
नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यापासून लाखो प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उत्तर मुंबईतील प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. येथील नागिरकांचा थेट विमानतळापर्यंत वाहतुक कोंडीमुक्त प्रवास होण्यासाठी सिडकोने ठाणे ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान एक 26 किलोमीटर लांबीचा उन्नत कॉरिडॉर उभारणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रशासकीय व तांत्रिक परवानग्या मिळविण्याच्या उद्देशाने सिडकोने तज्ज्ञ सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी सिडकोने 65 लाखांच्या खर्चाची निविदा 12 ते 26 फेब्रुवारी दरम्यान मागवल्या आहेत.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि उत्तर मुंबई भागातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या भागातून विमानतळाकडे थेट, जलद आणि सिग्नलमुक्त मार्ग उपलब्ध नसल्याने प्रवाशांना सध्या ठाणे-बेलापूर मार्ग, पाम बीच रोड किंवा अन्य पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागत आहे. परिणामी, वाहतूक कोंडी आणि वेळेचा अपव्यय होत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने ठाणे-विमानतळदरम्यान उन्नत कॉरिडॉर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्प सुमारे 26 किलोमीटर लांबीचा असणार असून बहुतांश भाग उन्नत स्वरूपात बांधण्यात येणार आहे. या मार्गामुळे ठाणे ते नवी मुंबई विमानतळ प्रवासाचा वेळ सध्याच्या 80-90 मिनिटांवरून थेट 30 ते 45 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. हा मार्ग पूर्णपणे सिग्नलमुक्त होणार आहे. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान प्रस्तावित अखंड उन्नत रस्ता मार्गिकेसाठी सीआरझेड मंजुरी, वन मंजुरी व इतर लागू मंजुरी मिळण्यािसाठी सल्लागार नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी सिडकोने निविदा प्रक्रिया सुरु केली असून 12 ते 26 फेब्रुवारीपर्यंत निविदा भरता येणार आहेत. सल्लागाराचा कालावधी 9 महिन्यांचा असणार आहे. निविदेचा खर्च 65 लाख रुपये अपेक्षित धरला आहे. सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध शासकीय विभागांकडून आवश्यक मंजुरी मिळविण्याचे काम वेगाने हाती घेतले जाईल. मंजुरी प्रक्रिया पूर्ण होताच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन यशासाठी हा उन्नत कॉरिडॉर अत्यंत निर्णायक व गेमचेंजर ठरेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
सिडकोच्या अंदाजानुसार, प्रकल्पासाठी सुमारे 8,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, सल्लागार नियुक्तीनंतर तयार होणाऱ्या प्रकल्प अहवालातून प्रकल्पाची अंतिम रचना, अचूक खर्च, तांत्रिक आराखडे आणि अंमलबजावणीची टप्प्याटप्प्याची योजना निश्चित केली जाणार आहे. भूसंपादन, पर्यावरणीय परिणाम, वाहतूक व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवहार्यता या बाबींचा अभ्यास करूनच कार्यवाही होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai