माथाडी कामगारांचे कामबंद आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 07, 2026
- 22
50 किलोपेक्षा जादा जड गोण्या उचलण्यास विरोध
नवी मुंबई : 50 किलोपेक्षा जादा वजनाच्या कांदा-बटाट्याच्या गोण्या उचलणार नाहीत, या भूमिकेवर माथाडी कामगार ठाम राहिल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) येथील कांदा-बटाटा बाजारात सलग पाचव्या दिवशी व्यवहारांवर मोठा परिणाम झाला. कामगारांच्या कामबंद आंदोलनामुळे निम्म्याहून अधिक मालवाहू गाड्या बाजारातच उभ्या राहिल्या आहेत. आंदोलन असेच सुरू राहिल्यास येत्या काही दिवसांत मुंबई तसेच मुंबई महानगर प्रदेशातील किरकोळ बाजारावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. तसेच वाढत्या उन्हाच्या तडाख्यात नाशवंत कांदा सडण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्य शासनाने कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कांदा-बटाट्याच्या गोण्यांचे वजन 50 किलोपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात अनेक व्यापारी अद्याप 60 ते 70 किलो वजनाच्या गोण्या पाठवत असल्याचा आरोप माथाडी कामगारांनी केला. गेली चार वर्षे याबाबत व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने अखेर कामबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे माथाडी कामगार संघटनेने स्पष्ट केले. कांदा-बटाटा बाजारात दररोज शेकडो गाड्यांमधून हजारो क्विंटल मालाची आवक होते. सध्या मात्र 50 किलोपेक्षा जादा वजनाच्या गोण्या उतरविण्यास कामगारांनी नकार दिल्याने बाजारपेठेत शेतमालाने भरलेल्या गाड्या थांबून असल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार विस्कळीत झाले आहे. शेतमाल किरकोळ बाजारात माल पोहोचण्यात यामुळे उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, पॅकिंगची पद्धत बदलण्यासाठी वेळ आणि अतिरिक्त खर्च येणार असून अचानक कामबंद आंदोलनामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. विशेषत: कांदा हा नाशवंत माल असल्याने उन्हात जास्त वेळ ठेवल्यास तो खराब होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तातडीने तोडगा काढण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. मालाची आवक घटल्यास त्याचा परिणाम काही दिवसांत किरकोळ बाजारावरही होऊ शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पुरवठा कमी झाल्यास कांदा-बटाट्याच्या दरात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आंदोलन लवकर मार्गी लागणे आवश्यक असल्याचे मत व्यापारी वर्तुळातून व्यक्त होत आहे.
माथाडी कामगारांनी या आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडताना, आम्ही पूर्णपणे काम बंद केलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार 50 किलो वजन मर्यादा असलेल्या गोण्या उतरवत असल्याचे म्हटले असून, मर्यादेपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या उचलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, याचा थेट परिणाम बाजारातील एकूण व्यवहारांवर दिसून येत आहे. त्यामुळे आंदोलन दीर्घकाळ चालल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होऊन मुंबईसह महानगर प्रदेशातील ग्राहकांनाही त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, “50 किलोची वजन मर्यादा हा राज्य शासनाचा स्पष्ट निर्णय आहे. कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन होत नसल्याने आम्हाला आंदोलन करावे लागले,” असे कांदा-बटाटा बाजारातील माथाडी कामगार नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. नियमांचे पालन झाल्यास काम तात्काळ सुरू करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तोडगा निघेपर्यंत बाजारातील व्यवहारांवरील अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai