मालमत्ता कर थकबाकीदारांना ‘अभय’
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 10, 2026
- 31
विलंब दंडावर मिळणार 50 टक्के सवलत ; 31 मार्च 2026 पर्यंत घेता येणार योजनेचा लाभ
नवी मुंबई ः महापालिकेच्या वतीने दि.10 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दि.31 मार्च 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मालमत्ताकर ‘अभय योजना’ लागू करण्यात येत आहे. ज्या मालमत्ताधारकांचा अद्याप मालमत्ताकर भरणे बाकी आहे, अशा थकबाकीदारांनी दिलेल्या मुदतीत मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांना विलंब दंडावर 50 टक्के इतक्या मोठया प्रमाणात सवलत देण्यात येत आहे. तरी या सवलतीचा लाभ घेऊन मालमत्ताकर धारकांनी थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
नवी मुंबई शहराच्या विकासासाठी मालमत्ता कर हा अत्यंत महत्त्वाचा महसूल स्त्रोत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, शिक्षण तसेच विविध नागरी सुविधा पुरविण्यासाठी नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या मालमत्ताकराचा उपयोग करण्यात येतो. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वेळेत कर भरणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पालिकेच्या मालमत्ता कर वसूली मोहीमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणावर कर संकलन होत आहे. तथापि, काही मालमत्ताधारकांकडून अद्याप थकीत रकमेचा भरणा झालेला नाही. या पार्श्वभूमीवर थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागामार्फत विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत दि. 10 मार्च 2026 रोजी, सकाळी 10 वाजल्यापासून ते दि.31 मार्च 2026 रोजी, रात्री 12 वाजेपर्यंत या कालावधीत ही अभय योजना लागू असून या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांना विलंब दंडावर 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आर्थिक वर्ष 2025-2026 पर्यंतची संपूर्ण थकबाकी जाहीर केलेल्या अभय योजनेच्या कालावधीत एकरकमी भरणे आवश्यक आहे. दि.31 मार्च 2026 नंतर नियमित वसूली प्रक्रिया सुरू राहणार आहे. तरी नवी मुंबई महारपालिकेच्या वतीने सर्व थकबाकीदार मालमत्ताधारकांना आवाहन करण्यात येते की, जाहीर कालावधीतील सवलतीचा लाभ घेऊन 31 मार्च 2026 पूर्वी थकीत मालमत्ता कराचा भरणा करावा व विलंब दंडातील 50 टक्के सवलतीचा लाभ घ्यावा.
योजनेच्या अटी व शर्ती
- अभय योजना नवी मुंबई गरपालिका क्षेत्रातील सर्व थकीत मालमत्ताधारकांसाठी लागू राहील.
- दि. 31 मार्च 2026 पर्यंत देय मालमत्ता करापोटी थकबाकी असलेल्या कराचा संपूर्ण भरणा करणाऱ्या थकबाकी करदात्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी पालिकेचे संकेतस्थळ आणि ‘माय एनएमएमसी माझी नवी मुंबई’ या मोबाईल ॲपचा उपयोग सर्व मालमत्ताधारकांनी करावा. कराचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करता येईल.
- सदर योजनेअंतर्गत कराचा भरणा करण्यासाठी मुख्यालयासह सर्व विभाग कार्यालय तसेच संलग्न भरणा केंद्र उपलब्ध असून उपरोक्त नमूद कालावधीत रोख / धनादेश / धनाकर्षाने भरणा करता येईल. धनादेश हे अभय योजनेच्या कालावधीमध्ये कोणत्याही कारणास्तव न वठल्यास अर्जदारास अभय योजनेचा लाभ अनुज्ञेय होणार नाही याची नोंद घ्यावयाची आहे.
- अभय योजनेअंतर्गत मूळ मालमत्ता कराच्या थकीत रक्कमेत कोणतीही सवलत नसून मूळ मालमत्ता कर तसेच सवलतीनंतरच्या शास्तीसह येणारी संपूर्ण देय रक्कम एकरकमी भरणा करणे आवश्यक आहे.
- या योजनेच्या प्रारंभापूर्वी अथवा समाप्तीनंतर भरणा केलेला मालमत्ता कर तसेच शास्ती / व्याजाच्या रकमेच्या संदर्भात कोणतीही सूट मिळणार नाही तसेच त्यांचा परतावा देखील मिळणार नाही.
- अभय योजनेअंतर्गत नमूद केलेल्या भरणा करावयाच्या रक्कमेपेक्षा जादा भरणा केलेल्या रक्कमेचा परतावा मिळणार नाही.
- जर अभय योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अपील, पुनर्निरीक्षण आवेदन, संदर्भ आवेदन, न्यायालयात दाखल केलेला दावा किंवा रिट याचिका दाखल केली तर अभय योजनेनुसार संबंधित कालावधीसाठी दिलेल्या सवलती काढून घेण्यात येतील.
- या व्यतिरिक्त महानगरपालिका ठरावात नमूद असलेल्या अभय योजनेतील इतर बाबींची अंमलबजावणी / मान्यतेचे अंतिम अधिकार महापालिका आयुक्त यांचे राहतील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai