अवैध बांधकामे, फलकांवर ‘लक्ष’
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 14, 2026
- 32
आ.मंदा म्हात्रे यांच्या मागणीवर 8 दिवसात कारवाईचे आश्वासन
नवी मुंबई ः नवी मुंबईच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या आणि वाहन चालकांच्या जिवाशी खेळणाऱ्या पामबीच मार्गावरील अनधिकृत लोखंडी कमानी, जाहिरात फलके आणि अनधिकृत बांधकामे या गंभीर मुद्यावर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडून शासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत, पामबीच मार्गावर उभारण्यात आलेले अनधिकृत लोखंडी कमानीवर येत्या 8 दिवसांत कारवाई करण्याचे व अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे तोडण्याची कारवाई सुरु राहणार असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिले आहे.
नवी मुंबईत सिडको आणि महापालिकेच्या मालकीची उद्याने, मैदाने आणि आरक्षित भूखंडांवर भूमाफिया, गॅरेजवाले, भंगारवाले यांनी अतिक्रमण केल्याचा तसेच पामबीचवर अनधिकृतपणे कमानी व जाहीरात फलक उभारल्या आहेत याकडे आ. मंदाताई म्हात्रे यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे शासनाचे लक्ष वेधले. विशेषतः पामबीच मार्गावर एमसीझेडएमए आणि वाहतूक पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता अवाढव्य लोखंडी सांगाडे आणि एलईडी जाहिरात फलक उभारल्याचे तसेच त्यामुळे वाहन चालकांचे लक्ष विचलित होऊन भीषण अपघात होण्याची भिती आमदार म्हात्रे यांनी व्यक्त केली. आ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, अनेक आरक्षित भूखंडांवर महापालिकेतील काही लोकप्रतिनिधींनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी गोडाऊन, नर्सरी, ढाबे आणि भंगाराची दुकाने थाटून अनधिकृत धंदा मांडला आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून सुरु असलेला अनधिकृत बांधकामांचा सपाटा तातडीने थांबवून अतिक्रमणे जमीनदोस्त करावीत अशी मागणी केली.
आमदारांच्या या लक्षवेधीवर उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नवी मुंबई महापालिकेने 870 अतिक्रमणांना नोटीस पाठवली होती. त्यामधील 340अनधिकृत बांधकामे व 3133 झोपडयांवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी 126 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सिडकोने 10160 अवैध बांधकामांना नोटीसा पाठवल्या होत्या. त्यापैकी 8417 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून 4 गुन्हे दाखल केल्याची माहिती मिसाळ यांनी दिली. महापालिका व सिडकोकडून हजारो नोटिसा देऊन हजारो अतिक्रमणे हटवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पामबीच मार्गावरील एलईडी फलक आणि लोखंडी सांगाडे नागरिकांच्या जिवावर बेतू शकतात. त्यामुळे 8 दिवसांत पामबीचवरील अनधिकृत लोखंडी कमानीवर कारवाई केली जाईल, असे नगरविकास मंत्री सांगितले. शहर नियोजनबद्ध व सुरक्षित ठेवण्यासाठी अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु आहे ती यापुढे तशीच सुरु राहिल असेही मिसाळ यांनी स्पष्ट केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai