वाशीत रंगणार ‘महालक्ष्मी सरस’ ची बहार
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 20, 2026
- 22
ग्रामीण उत्पादनांना शहरी बाजारपेठ; 490 स्टॉल सज्ज
नवी मुंबई : नवी मुंबईत वाशी येथे लवकरच रंगणार असलेल्या ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध हस्तकला वस्तू, पारंपरिक वस्त्रप्रकार आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा खजिना या प्रदर्शनातून नागरिकांना पाहायला मिळणार आहे. महिलांच्या स्वावलंबनाला चालना देणारा हा उपक्रम ग्राहकांसाठीही आकर्षणाचे केंद्र ठरणार असून, मोठ्या प्रमाणात स्टॉल्स उभारण्यात येत आहेत. ग्रामीण कलेला शहरी बाजारपेठ मिळवून देणाऱ्या मेळ्याचे नवी मुंबईतील हे तिसरे वर्ष आहे. 24 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत या मेळ्याव्याचा लाभ घेऊन महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन उमेदद्वारे करण्यात आले आहे.
ग्रामीण महिलांच्या कष्टाला योग्य बाजारपेठ मिळवून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन 2026’ हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत निलेश सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी व्यक्त केले. लखपती दिदींची निर्मिती करणे, ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक साक्षरता वाढवणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याने त्यांनी सांगितेल. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत आयोजित या भव्य प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा मंगळवार दि. 24 मार्च 2026 रोजी सिडको प्रदर्शन केंद्र वाशी, नवी मुंबई येथे होणार असून, दि. 24 मार्च ते 04 एप्रिल 2026 या कालावधीत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाबद्दल माहिती देण्यासाठी आज सीबीडी बेलापूर येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उमेदचे अतिरिक्त संचालक निखिलकुमार ओसवाल, उपसंचालक (वित्त) बाळासाहेब तट्टू, आवर सचिव धनवंत माळी, उपसंचालक संदिप जठार, उपसंचालक श्वेता पालवे आणि कोकण विभागीय माहिती उपसंचालक मनोज सानप हे उपस्थित होते.
उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर हे माहिती देताना म्हणाले की, ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविका उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येतो. या अभियानांतर्गत लाखो महिलांना स्वयं-सहाय्यता समूहांमध्ये संघटित करण्यात आले असून, त्यांना बचत, कर्ज, आर्थिक साक्षरता आणि उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. राज्यातील हजारो गावांमध्ये या अभियानाचा विस्तार झाला असून, महिलांना स्थानिक स्तरावर निर्णयक्षमता आणि आर्थिक स्वावलंबन मिळत आहे. या अभियानाअंतर्गत महिलांसाठी विविध कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जातात. आर्थिक साक्षरतेसाठी - प्रशिक्षण, उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन, तसेच लघुउद्योग आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यात येते. यामुळे महिलांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावत आहे. तसेच, बँक कर्ज सुविधा, फिरता निधी आणि समुदाय गुंतवणूक निधी यांच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय विस्तारासाठी आर्थिक पाठबळ दिले जाते. शेती आधारित उपजीविका, उत्पादक गट, तसेच कस्टम हायरिंग सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.
या राज्यस्तरीय प्रदर्शनात एकूण 490 स्टॉल्स उभारण्यात येणार असून, महाराष्ट्रासह इतर राज्यांतील महिला बचत गट, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि महिला शेतकरी उत्पादक गट सहभागी होणार आहेत. याशिवाय विविध शासकीय विभागांचेही स्टॉल्स येथे असणार आहेत. प्रदर्शनातील 70 स्टॉल्सचे भव्य फूड कोर्ट हे प्रमुख आकर्षण ठरणार असून, राज्याच्या विविध भागांतील पारंपरिक चवींचा आस्वाद घेण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. तसेच हातमागाचे कापड, लाकडी कलाकुसर, बंजारा व वारली कला, दागिने आणि विविध हस्तकला वस्तू थेट ग्रामीण उत्पादकांकडून खरेदी करता येणार आहेत.
यंदा ‘व्हिलेज एरिया’ संकल्पना, अनामॉर्फिक वॉल, एआर फोटोग्राफी आणि इन्फोग्राफिक वॉल यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संपूर्ण प्रदर्शन वातानुकूलित हॉलमध्ये भरवण्यात येणार असून, लहान मुलांसाठी विशेष ‘प्ले एरिया’चीही सोय करण्यात आली आहे. अशी माहिती उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी दिली. ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरेदी करावी, असे आवाहन निलेश सागर यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai