85 कोटींच्या प्रस्तावांना विनाचर्चा मंजुरी
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 10, 2026
- 23
नवी मुंबई : महापालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे 85 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये आठही विभागातील विविध रस्त्यांची, पदपथांची दुरुस्ती, गटार, नाले, भाजी मंडई, स्मशानभुमी,आरोग्यकेंद्र, मलनिस्सारण वाहिन्या अशा अनेक पायाभुत सेवासुविधांच्या कामांचा समावेश आहे. तसेच वंडर्स पार्क येथे फेरबदल करुन सुधारणा करणे, घनकचरा प्रकल्प देखभाल-दुरुस्ती कंत्राट वाढवणे ही कामेही अंतर्भुत आहेत. मात्र या सर्व प्रस्त्ाावांवर स्थायी समितीमध्ये विनाचर्चा मंजुरी देण्यात आली.
स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या एकूण 41 प्रस्तावांपैकी तब्बल 38 प्रस्ताव हे शहरातील विविध विकासकामांशी संबंधित होते. यात रस्ते दुरुस्ती, गटार व्यवस्था, उद्यानांचे सुशोभीकरण, तसेच मूलभूत सुविधांशी निगडित कामांचा समावेश आहे. या बहुतांश प्रस्तावांना चर्चेविना मंजुरी देण्यात आली. यामधील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत वर्ग करण्याबाबतचा प्रस्ताव अधिक चर्चेसाठी स्थगित करण्यात आला तर रु. पाच लाखांपेक्षा जास्त आणि 25 लाखापेक्षा कमी खर्चाच्या कामासंबंधीचे दोन विषय दफ्तरी जमा करण्यात आले.
सामान्यतः इतक्या मोठ्या आर्थिक तरतुदींच्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा अपेक्षित असताना, अल्पावधीतच सर्व विषय मंजूर केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. शहराच्या विकासासाठी निधी मंजूर होणे सकारात्मक असले तरी पारदर्शकता आणि सखोल चर्चेचा अभाव ही चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया काही सदस्यांनी व्यक्त केली. दरम्यान, सर्व प्रस्ताव नियमानुसार सादर करण्यात आले असून तातडीच्या कामांना विलंब होऊ नये, यासाठी जलद निर्णय घेण्यात आल्याचे स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी सांगितले.
- तातडीच्या 10 प्रस्तावांना स्थगिती
विकास कामांच्या 38 प्रस्तांवाना मंजुरी दिल्यांनतर सभापती अशोक पाटील यांच्याकडून तातडीचे दहा विषय पटलावर घेण्यात आले. पण या विषयांना स्थायी समिती सदस्य जयवंत सुतार यांनी आक्षेप घेतला. स्थायी समितीची बैठक ही आठवड्यातून एकदा होत असल्यामुळे सात दिवस आधीच प्रस्ताव का देण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित करत हे प्रस्ताव स्थगित ठेवण्यात येऊन पुढील आठवडयामध्ये होणाऱ्या बैठकीत प्रस्ताव चर्चेसाठी घेण्यात यावी अशी सूचना केली. त्यानंतर सभापती अशोक पाटील यांनी तातडीच्या विषयांना स्थगिती देत बैठकीच्या आधीच प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. - सरोज पाटील आंदोलन करणार
सुरुवातीपासून तातडीचे विषय पटलावर आले की त्यावर सदस्यांकडून चर्चा होत असे. मात्र आता अचानक नवनवे पायंडे सत्त्ताधाऱ्यांकडून पाडले जात आहेत. शहरातील अत्यावश्यक सोयी सुविधांचे विषय तातडीचे विषय म्हणून जर स्थायी समितीत आले तर त्यावर नागरिकांच्या हितार्थ चर्चा होणे अपेक्षित आहे. जर यापुढे महत्वाच्या तातडीच्या विषयांवर बोलू दिले नाही तरी भविष्यात मी आंदोलनाचा बडगा उगारल्याशिवाय राहणार नाही अशी भुमिका सरोज पाटील यांनी घेतली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai