आपत्ती व्यवस्थापनासाठी कोंकण विभाग सज्ज
- by Aajchi Navi Mumbai
- May 13, 2026
- 31
नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींना तात्काळ प्रतिसाद देण्याचे कोकण आयुक्तांचे निर्देश
नवी मुंबई : आपत्ती काळात सर्व यंत्रणांनी नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अचूक नियोजन करावे, कार्य व बचाव साहित्य तात्काळ घटनास्थळी पोहचेल, याची खातरजमा करावी. तसेच आपत्ती व्यवस्थापनेबाबत नागरिकांना आवश्यक माहितीचा प्रचार व प्रसिध्दीवर विशेष भर द्यावा, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले.
पावसाळा पूर्वीच्या आपत्ती व्यवस्थापन तयारीचा आढावा घेताना दूरदृष्यप्रणालीद्वारे कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदूर्ग, मुंबईचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरपालिका अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, कोकण रेल्वे, एसटी महामंडळ, नागरी संरक्षण, हवामान विभाग व औद्योगिक आरोग्य सुरक्षा विभागातील अधिकारी उपस्थित होते. आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या की, कोकणात पावसाळ्यापूर्वी अचूक नियोजनाची आवश्यकता आहे. पावसाळयापूर्वी करण्यात येणारी नाले सफाई, रस्ते दुरुस्ती, झाडांची छाटणी अशी कामे पूर्ण करुन घेण्यात यावी. कोकण विभागीय स्तरावर चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, सर्व जिल्हा आणि तालुका स्तरावरही अशाच प्रकारचे अहोरात्र नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून संबंधित प्राधिकरणाकडून मंजूरी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील नालेसफाईची कामे 31 मे 2026 पूर्वी 100% पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच,अतिधोकादायक आणि बेकायदेशीर इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षित स्थलांतराचे नियोजन तातडीने करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. कोकणात शोध व बचाव पथके कार्यरत असून त्यात प्रशिक्षित सदस्य आहेत. या सदस्यांनी ‘आपदा मित्र’ उपक्रमांतर्गत तालुका व जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेतले आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या साहित्यांची चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रिल्स राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोकण विभागात 09 मोठे, 09 मध्यम प्रकल्प आणि 143 लघु प्रकल्प अशी धरणे आहेत. पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे धरणे भरल्यास, नियोजित पद्धतीने पाण्याचा विसर्ग करावा व नागरिकांना वेळीच इशारा द्यावा. यासाठी स्थानिक प्रशासनाने (उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिका) जलद प्रतिक्रिया देण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करावा. विसर्गाच्या आधी संबंधित यंत्रणांना सूचना देणे आवश्यक आहे, विशेषतः जेथे पाण्याचा धोका संभवतो. धबधब्यांच्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियोजन करावे. अशा ठिकाणी जवळपासच्या रिसॉर्ट, हॉटेल मध्ये साहसी खेळांवर बंदी आणावी, अशा ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पावसाळ्यात पूर, दरड कोसळणे, वीज कोसळणे, चक्रीवादळ, झाडे/इमारती कोसळणे, रस्ते बंद होणे, या घटना घडतात. अशा वेळी जेसीबी, डंपर, वूड कटर, ट्रक अशी यंत्रसामग्री तात्काळ उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. बाधित नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी शाळा, मंदिर, हॉल इ. ठिकाणे निवासासाठी सज्ज ठेवावी व पाणी, अन्न, वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात. धरणातील पाण्याचा विसर्ग नियोजित पद्धतीने करावा व स्थानिक प्रशासनाने विसर्गापूर्वी नागरिकांना वेळीच इशारा द्यावा. एनडीआरएफ च्या तुकडयांना तैनात ठेवावे. त्यांचे संपर्क क्रमांक अद्यावत ठेवावे. रेल्वे व रस्ते वाहतुकीस अडथळा झाल्यास पर्यायी वाहतुकीसाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाशी समन्वय साधावा, असेही त्या म्हणाल्या. पावसाळ्यात साथीचे रोग वाढू शकतात. यासाठी औषधांचा साठा, पाण्याचे शुद्धीकरण, साथरोग नियंत्रण कक्ष स्थापनेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नागरी संस्थांनी नियमितपणे पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये आणि महानगरपालिका स्तरावर चोवीस तास आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कक्षात संगणक, इंटरनेट, ई-मेल, दूरध्वनी, हॉटलाईन सेवा उपलब्ध असावी. आपत्तीशी संबंधित कोणतीही माहिती तात्काळ शासनाला कळवावी. नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींना तात्काळ प्रतिसाद द्यावा, अशा सूचना आयुक्त रुबल अग्रवाल यांनी यावेळी दिल्या. प्रशासनाने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहावे, असे आवाहन रुबल अग्रवाल यांनी यावेळी केले. अडकलेल्या किंवा आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी जेसीबी, बोट्स आणि प्रशिक्षित मनुष्यबळ अर्ध्या तासाच्या आत घटनास्थळी पोहोचेल, याची खातरजमा करण्याचे आदेशही यावेळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
कोकण विभागातील आपत्ती नियंत्रण कक्षाचे क्रमांक
जिल्हा दूरध्वनी नियंत्रण कक्ष- दूरध्वनी क्रमांक
* मुंबई शहर 022-22664232 08657106273
* मुंबई उपनगर 022-69403344 08104729077
* ठाणे 022-25301740 09372338827
* पालघर 02525-297474 08237978873
* रायगड 0241-222118/227452 0875152363
* रत्नागिरी 02352-222233 07057222233
* सिंधुदुर्ग 02362-228847 07498067835
* मंत्रालय कंट्रोल रुम 022-22027990 022-22794229 09321587143
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai