मोरबे धरणाच्या जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडणी खंडीत
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 24, 2026
- 25
नवी मुंबई ः महापालिकेच्या मोरबे धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 2050 मि.मी. व्यासाच्या मुख्य भूमिगत जलवाहिनीवर पनवेल तालुक्यातील देवद व विचुंबे ग्रामपंचायत हद्दीत काही व्यक्तींमार्फत अनधिकृत नळजोडणी करून पाण्याचा वापर सुरु होता. सदर ठिकाणी दोन वेळा नळजोडणी खंडित करण्यात आली मात्र पुन्हा जलवाहिनीवर छेडछाड करुन अनधिकृत पाण्याचा वापर सुरु केला होता. अखेर खांदेश्वर पोलीसठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मोठ्या पोलीस बंदोबस्तात सदर अनधिकृत नळजोडणी निष्कासित करण्यात आली.
पनवेल तालुक्यातील देवद व विचुंबे ग्रामपंचायत हद्दीत काही व्यक्तींमार्फत अनधिकृत नळजोडणी केल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर नवी मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तात्काळ घटनास्थळी पाहणी केली असता मुख्य जलवाहिनीवर सुमारे 100 मि.मी. व्यासाची अनधिकृत नळजोडणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी एप्रिल 2025 मध्ये सदर अनधिकृत नळजोडणी महापालिकेमार्फत त्वरित खंडित करण्यात आली होती. तसेच विचुंबे व देवद ग्रामपंचायतींना दंडात्मक स्वरूपाची रु. 80,92,560 इतकी रक्कम भरण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये ब्रेकडाऊन दुरुस्तीच्या वेळी त्याच ठिकाणी पुन्हा अनधिकृत नळजोडणी करण्यात आल्याचे आढळून आले. सदर जोडणी खंडित करण्यासाठी पालिकेने कारवाई हाती घेतली असता काही स्थानिकांकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे त्या वेळी सदर जोडणी खंडित करणे शक्य झाले नाही. तसेच देवद व विचुंबे ग्रामपंचायतींना सदर अनधिकृत जोडणी त्वरित काढून टाकण्याबाबत व दंडात्मक रक्कम भरण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. तथापि, त्यांच्याकडून कार्यवाही करण्यात आली नाही. त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने दि.28 मार्च 2026 रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत खांदेश्वर पोलीस स्टेशन यांचेकडील पोलीस बंदोबस्तात संबंधित अनधिकृत नळजोडणी खंडित करण्यात आली. यानंतर महापालिकेच्या पथकाने केलेल्या पुढील तपासणीत याच ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर पुन्हा छेडछाड करून पाण्याचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे आढळून आले. अनधिकृतरित्या वापरलेल्या पाण्याबाबत दंडात्मक स्वरूपाची रु. 1,17,61,239 इतकी रक्कम भरणा करण्याबाबत जिल्हा परिषद, रायगड यांना कळविण्यात आले व सदर अनधिकृत जोडणी त्वरित खंडीत करण्यासाठी कळविण्यात आले.
सदर प्रकार तिसऱ्यांदा निदर्शनास आल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच दि. 19 जून 2026 रोजी, रात्री नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत खांदेश्वर पोलिस स्टेशन यांचे वतीने उपलब्ध मोठ्या प्रमाणातील पोलीस बंदोबस्तात सदर अनधिकृत नळजोडणी निष्कासित करण्यात आली व आवश्यक उपाययोजना करण्यात आली. या ठिकाणी निगराणीकरिता सीसीटिव्ही बसविण्यात आले असून जलवाहिनीशी पुन्हा छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास पोलीस विभागाकडून संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai