धावत्या लोकलवर दगडफेक
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 04, 2026
- 32
नवी मुंबई : हार्बर मार्गावरील धावत्या लोकलवर अज्ञात व्यक्तीने केलेल्या दगडफेकीत लोकलमधील गार्ड (ट्रेन मॅनेजर) गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे जुईनगर आणि नेरुळ रेल्वे स्थानकादरम्यान घडली. सुनिलकुमार उपेंद्र प्रसाद (48) असे या दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या गार्डचे नाव असून जखमी झाल्यानंतर देखील त्यांनी कर्तव्याला प्राधान्य देत रक्तबंबाळ अवस्थेत लोकल सुरक्षितपणे पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत नेली. जखमी सुनिलकुमार यांच्यावर पनवेल मधील लाईफ लाईन हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असून वाशी रेल्वे पोलिसांनी लोकलवर दगडफेकणाऱया अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.
सुनिलकुमार प्रसाद हे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 2015 पासून गार्ड (ट्रेन मॅनेजर) म्हणून कार्यरत असून सध्या ते पनवेल रेल्वे स्थानकावर नियुक्त आहेत. शुक्रवारी पहाटे त्यांची ड्युटी वाशी ते वडाळा आणि त्यानंतर वडाळा ते पनवेल अशी होती. त्यानुसार पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ते वडाळा-पनवेल लोकल घेऊन पनवेलच्या दिशेने निघाले. पहाटे 5.45 वाजता त्यांची लोकल जुईनगर व नेरुळ स्थानकादरम्यान पोल क्रमांक 32/211 जवळून जात असताना ते गार्ड डब्यातून मागील बाजूस लक्ष ठेवून होते. त्याच वेळी अज्ञात व्यक्तीने भरधाव लोकलवर दगड भिरकावला.
हा दगड वेगाने येऊन गार्ड सुनिलकुमार यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईच्या वर आदळला. दगड काही इंच खाली लागला असता तर त्यांचा डोळाच निकामी झाला असता, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत सुनिलकुमार गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या जखमेतून मोठा प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी लोकल मध्येच न थांबवता कर्तव्य बजावत ती सुरक्षितपणे पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत आणली.
पनवेल येथे पोहोचल्यानंतर त्यांनी स्टेशन मास्तरांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांना तातडीने पनवेल येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी रुग्णालयातच त्यांचा जबाब नोंदवला. प्रसाद यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत अंधार असल्यामुळे दगडफेक करणारी व्यक्ती दिसली नसल्याचे सांगितले आहे. त्यांच्या तक्रारीवरुन वाशी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून धावत्या लोकलवर दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरु केला आहे.
या घटनेमुळे हार्बर मार्गावरील प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून धावत्या लोकलवर दगडफेक करणाऱयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांकडून होत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai