ऐरोलीत नागरी कामांचे लोकार्पण
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 31, 2021
- 514
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
नवी मुंबई ः ऐरोली विभागातील नागरी कामांचे लोकार्पण सोमवारी ठाणे जिल्हाचे पालकमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये चिंचपाडा येथील बायोगॅस आणि वीजनिर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण, कोविड केअर केंद्राचे उद्घाटन, दिघा गावातील भूखंडावरील जलकुंभ आणि मल:उदचन केंद्राचे भूमीपूजन करण्यात आले. त्याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनच्या कामाची पाहणी करण्यात आली.
ऐरोलीतील चिचंपाडा या झोपडपट्टीत विभागात माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या माध्यामातून झोपडपट्टी विभागात कोविड सेंटर उभे करण्यात आले. या सेंटरची क्षमता एकूण 100 बेडची असून त्यापैकी सुमारे 17 बेडवर आयसीयू व व्हेंटिलेटरची आणि अन्य सर्वच बेडवर ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लहान मुलांसाठी विशेष आयसीयू वॉर्डही या रुग्णालयात तयार करण्यात आले आहे. या सेंटरच्या माध्यामातून ऐरोली आणि दिघा परिसरातील झोपडपट्टीवासियांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या धरतीवर वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. दिघा गावातील भूखंडावरील जलकुंभ आणि मल:उदचन केंद्राचे भूमीपूजनही शिंदे यांच्या हस्ते स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थिती पार पडले. नागरी कामांच्या लोकार्पणाप्रसंगी ठाण्याचे खासदार राजन विचारे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, माजी नगरसेवक नवीन गवते, शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल मोरे, ममित चौगुले सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बायोगॅस व वीजनिर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण
पालिकेने ऐरोलीतील चिंचपाडा येथे 5 टन क्षमतेचा सेंद्रिय घनकचरा, सांडपाणी आणि टाकाऊ वस्तूच्या माध्यमातून बायोगॅस व वीजनिर्मिती प्रकल्प उभा केला आहे. त्याचेही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. घनकचरा आणि सांडपाण्याच्या माध्यमातून बायोगॅस आणि वीज निर्मिती करणारा हा राज्यातील प्रकल्प आहे. या प्रकल्पांमधून जवळपास प्रतिदिन 300 युनिट्स वीजनिर्मिती होणार असून 300 युनिट्स वीजनिर्मिती मधून चिंचपाडा विभागातील रस्त्यालगत असणारे 300 पथदिवे पेटणार आहे. त्याचप्रमाणे बायोगॅसमधून स्वयपाकासाठी घरगुती इंधनाचा देखील वापर करण्यात येणार आहे. बॉयोगॅस युनिट उभारण्यासाठी पालिकेने एक कोटी 61 लाख 57 हजार 140 रुपये खर्च कलेला आहे. तर वीजनिर्मिती प्रकल्पासाठी खासदार राजन विचारे यांनी 70 लाखांचा निधी त्याचप्रमाणे पालिकेने 45.82 लाख रुपये व माइन्ड स्पेस बिझनेस प्रा. लि यांनी सीएसआर फांडातून 62.50 लाख रुपये खर्च करुन हा प्रकल्प उभा केला आहे.
काही महिन्यात स्मारक नागरिकांसाठी खुले होणार
ऐरोली टोल नाक्याजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा पाहणी दौराही पालकमंत्री एकनाथ शिंदे व नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासमवेत करण्यात आला. 2011 पासून प्रलंबित असलेले स्मारक येत्या काही महिन्यात नागरिकांसाठी खुले होणार असल्याची माहिती बांगर यांनी दिली. पालकमंत्री शिंदे व खासदार राजन विचारे यांनी या वास्तूची संपूर्ण पाहणी करून आयुक्तांना महात्वपूर्ण निर्देश दिले. मुख्य इमारतीमधील ध्यान कक्ष तसेच लोकांना त्यांच्या जीवनात प्रेरणा मिळेल यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनपट उलगडणारे छायाचित्र संग्रह असलेले म्युझियम व आर्ट गॅलरीची पाहणी या वेळी केली.
पालकांचे छत्र हरपलेल्यांना मदत
कोरोनाच्या कालावधीत तत्परतेने सेवा बजावणार्या डॉक्टर नर्स आणि इतर सेविकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोरोनामुळे मृत आई वडिलांचे छत्र हरपलेल्या कदम त्यांच्या मुलाला आर्थिक मदत देण्यात आली. तर पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai