विरार-अलिबाग कॉरिडॉर बाधितांचे लाक्षणिक उपोषण
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 17, 2021
- 1663
गावे वाचवली नाहीत तर जमिन या प्रकल्पाला देणार नाही
नवी मुंबई : विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर प्रकल्पामुळे पनवेल तालुक्यातील बोर्ले, सांगडे, बेलवली आणि पाली खुर्द गावातील शेतकरी बाधित होणार आहेत. ही चार गावे संपादित होऊ नयेत नहिणून ग्रामस्थांच्या सहा हजार हरकतींना केराची टोपली दाखवून महसूल विभागाने शेतकर्यांचा विरोध डावलून भूसंपादनासाठी मोजणी सुरू केली आहे. त्यामुळे संतप्त शेतकर्यांनी 17 डिसेंबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पनवेल प्रांताधिकारी कार्यालयासमोर केले.
एमएमआरडीएच्या माध्यमातून विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी पनवेल, उरण तालुक्यातील 44 गावांमधील जमीन संपादित करण्यात येणार आहे. पनवेल तालुक्यातील 15 गावे या प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत. याशिवाय बोर्ले, सांगाडे, बेलवली आणि पाली खुर्द गावातील जमीन आणि गावातील मालमत्ता संपादित करण्यात येणार आहे. प्रकल्पामुळे गाव उध्वस्त होण्याची भीती शेतकर्यांना आहे. मोठ्या विकासकांच्या जमिनी वाचवण्यासाठी आमच्या गावात जाणीवपूर्वक प्रकल्प उभारला जात असल्याचा आरोप शेतकर्यांकडून होत आहे. 2016 मध्ये नकाशात बदल करण्याची सूचना नैना प्राधिकरणाने एमएमआरडीएला केली आहे. नवीन नकाशानुसार प्रकल्प उभारल्यास गावातील घरे, गावठाण, कोणत्याही बांधकामाला धोका नाही. मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकर्यांनी जमीन मोजणीला विरोध केला आहे.
यापुर्वी आमदार बाळाराम पाटील व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शेतकर्यांनी विरोध केला आहे. तरीही महसूल विभागाने 29 नोव्हेंबरपासून पुन्हा मोजणीला सुरुवात केली आहे. याविरोधात शेतकर्यांनी 17 डिसेंबर रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या संदर्भात तहसिलदार पनवेल यांनी एमएमआरडीएला पत्र पाठवून शेतकर्यांना उपोषणापासून परावृत्त करावे असे सांगितले होते. मात्र यावर कोणताही प्रतिसाद न आल्याने अखेर शेतर्यांनी शुक्रवारी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या अॅड सुरेश ठाकुर, सुरेश पवार, वामन शेळके, सुधाकर पाटील, संतोष पवार, बबन पवार व नामदेव फडके यांनी प्रांताधिकारी, एमएसआरडीसीचे अधिकारी यांच्या समोर मांडल्या. या चर्चेनंतर एमएसआरडीसीचे अधिकारी यांनी उपोषण स्थळी येऊन ही चारही गावे वाचविण्याबाबत आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. याबाबत 30 डिसेंबर रोजी शेतकर्यांच्या समितीच्यावतीने एमएसआरडीसीसोबत पुन्हा एकदा करण्यात येणार आहे. एमएसआरडीसीच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
- प्रमुख मागण्या
1,शासनाच्या 2016 च्या छाननी कमिटीच्या अहवालानुसार विरार-अलिबाग मार्गातील बोर्ले, सांगडे, बेलवली व पालीखुर्द ही चार गावे वाचविण्याबाबत सहमती दर्शविली आहे त्याची अमंलबजावणी करावी
2.सदर महामार्गाचे काम एमएसआरडीसीकडे सोपवले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या महामार्गाच्या नविन आखणीची अमलंबजावणी करा. त्यामुळे 250 कोटी रुपयांची बचत, इंधनाची बचत व वेळेचीही बचत होईल.
3.आमची गावे वाचवली नाही तर आमची जमिन या प्रकल्पाला देणार नाही
4. ज्या शेतकर्यांच्या जमिनी यात संपादित होणार आहेत त्यांना केंद्रिय सुधारित कायदा-2013 नुसार मोबदला देण्यात यावा, भुखंड देण्यात यावेत व कायद्यानुसार पुनर्वसनाचे फायदे मिळावेत.
5.प्रातांधिकारी पनवेल या महामागातील नविन व जुन्या आखणीचा तुलनात्मक अहवाल त्वरीत सादर करुन जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशाचे पालन करावे - पर्यायी मार्गाची अमंलबजावणी नाही
बड्या भांडवलदारांसाठी शेतकर्यांचा बळी दिला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आमच्या अस्तित्वासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रशासनासोबत लढा देऊ असे प्रकल्पबाधितांची ठाम भुमिका आहे. आमचा या प्रकल्पाला विरोध नाही परंतु यासाठी आमची गावे उद्धवत होऊ देणार नाही. गावे विस्थापित करण्याऐवजी ग्रामस्थांनी रीतसर तसेच रस्त्याला जास्तीचा वळसा पडणार नाही या दृष्टीने पर्याय सुचविला आहे. मात्र त्याची अमंलबजावणी केली जात नाही म्हणून आंदोलन करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai