..तर 24 जानेवारीला विमानतळाचे काम बंद पाडणार
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 17, 2022
- 656
भूमिपुत्र परिषदेमध्ये प्रकल्पग्रस्त निर्धारावर ठाम
नवी मुंबई ः नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. या विमानतळावरून विमान उडवायचे असेल, तर दि. बा. यांचे नाव द्यावेच लागेल, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पनवेल तालुक्यातील प्रकल्पग्रस्त कोल्ही कोपर गावात आयोजित भूमिपुत्र निर्धार परिषदेत केले. दि.बांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्त आग्रही असून त्यांनी 23 जानेवारीपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तोपर्यंत निर्णय न घेतल्यास 24 जानेवारीला विमानतळाचे ताम बंद पाडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
लोकनेते माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधत (ता. 13) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून कोल्ही कोपर येथे भूमिपुत्रांची निर्धार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली आदी विभागातील समस्त हजारो भूमिपुत्र उपस्थित होते. तत्पूर्वी दिबांच्या पनवेल येथील संग्राम निवासस्थानी, तसेच जासई येथे तसेच गावोगावी दिबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या परिषदेमध्ये विमानतळाला दि. बां.चे नाव देण्याचा ठराव राज्य सरकारने घेतला नाही, तर 24 जानेवारीला विमानतळाचे काम बंद आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. नवी मुंबई विमानतळग्रस्तांनी आपला लढा कायम ठेवावा, असे केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूमिपुत्रांच्या दृष्टिकोनातून दोन ठराव जाहीर केले. काहीही झाले तरी दिबांच्या 100 व्या जयंतीपूर्वी दिबांचे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे तसेच सिडको संदर्भातील प्रकल्पग्रस्तांचे, बहुजनांचे प्रश्न सुटलेच पाहिजे नाही तर 24 जानेवारीला विमानतळाचे काम करून द्यायचे नाही असे दोन ठराव त्यांनी जाहीर केले.
यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुभाष भोईर, माजी खासदार संजीव नाईक, आमदार गणपत गायकवाड, आमदार प्रशांत ठाकूर, 27 गाव प्रकल्पग्रस्त समितीचे नेते, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दैवत, भूमिपुत्रांचे कैवारी, कष्टकर्यांचे असमान्य नेतृत्व, झुंझारनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव लागलेच पाहिजे आणि तो प्रकल्पग्रस्त, स्थानिक, भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तो पर्यंत क्रांतीची धगधगती मशाल शांत करणार नाही, असा इशारा आज या ‘भूमिपुत्र परिषद’ द्वारे सिडको आणि राज्य सरकारला देण्यात आला आहे. नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील लागलेच पाहिजे हि भूमिका भूमिपुत्रांनी कायम ठेवत रणशिंग फुंकले आहे. सिडको आणि राज्य सरकारनेही दिबांच्या नावाचा ठराव करून तो प्रस्ताव केंद्र सरकारला द्यावा, अशी आग्रही मागणी भूमिपुत्रांनी केली आहे.
- लढा कायम ठेवणार
पोलीस प्रशासनाने लवकरच सिडकोसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्या अनुषंगाने भूमिपुत्रांच्या बाजूने सकारात्मक निर्णय न झाल्यास 24 जानेवारीपासून विमानतळाचे काम बंद करण्याचा निर्धार पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तांची जाहीर करण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai