नोडनुसार पाणी पुरवठ्याच्या समस्या तत्काळ सोडवा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 26, 2022
- 764
पालिका, एमआयडीसी, मजीप्रा प्राधिकरणांना सिडकोच्या सूचना
नवी मुंबई ः मागील काही महिन्यांपासून नवी मुंबईच्या विविध नोडमधील आणि अन्य परिसरांतील नागरिकांकडून पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याबद्दल सिडकोकडे तक्रारी दाखल करण्यात येत होत्या. या तक्रारींची दखल घेऊन डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांनी सिडकोतील अधिकार्यांना आणि अन्य प्राधिकरणांना पाणी पुरवठ्या संदर्भातील समस्या तत्काळ सोडविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
पाणी पुरवठ्याच्या योग्य नियोजन करण्यासाठी सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत खारघर, तळोजा, कामोठे, कळंबोली नोड्सना सुरळीत पाणी पुरवठा करण्यासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. आवश्यक पाणी पुरवठा आणि निश्चित करण्यात आलेल्या जल वितरण आराखड्यानुसार, नवी मुंबई मनपाकडून खारघर नोडला 15 एमएलडी पाणी पुरवठा होणे अपेक्षित आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र 8 एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येतो. तसेच तळोजा नोडला 10 एमएलडी पाणी पुरवठा करण्याचे एमआयडीसीने मान्य केले असूनही प्रत्यक्षात 7 एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येतो. यामुळे उपरोक्त दोन्ही नोडमध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. या परिस्थितीचा आढावा घेऊन डॉ. संजय मुखर्जी यांनी संबंधित प्राधिकरणांना त्यांना ठरवून देण्यात आलेला पाणी पुरवठा संबंधित नोड्सना सुरळीतपणे करण्याबाबत सूचना दिल्या.
बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार पूर्वनिश्चित जल वितरण आराखड्याप्रमाणे नवी मुंबई मनपाकडून कामोठे नोडला 35 एमएलडी व खारघर नोडला 15 एमएलडी पाणी पुरवठा सुरळीतपणे करण्यात येईल. तसेच नवी मुंबई मनपाकडून खारघर नोडला नॉन-पिक अवर्समध्येदेखील पाणी पुरवठा करण्यात येईल. पूर्वनिश्चित केल्याप्रमाणे एमआयडीसीकडून तळोजा नोडला 8 ते 10 एमएलडी पाणी पुरवठा सुरळीतपणे करण्यात येईल व सुरळीत पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जलवाहिनीला बुस्टर पंप जोडण्याकरिता नियोजन करण्यात येईल. तर म.जी.प्रा. कडून पनवेल, कळंबोली, करंजाडे आणि काळुंद्रे नोड्सना पूर्वीप्रमाणेच 78 एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येईल.
- हेटवणे धरणातून अतिरिक्त पाणी
पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी सिडकोतर्फे हेटवणे धरणावरील विमोचकातील दाब विरहित व्यवस्था बदलून तेथे दाब युक्त जलवाहिनीची व्यवस्था करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर हेटवणे धरणातून अतिरिक्त पाणी नजीकच्या काळात उपलब्ध होणार आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात उपस्थित नगरसेवकांनी केलेल्या सूचनांवर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे सिडको आणि संबंधित प्राधिकरणांच्या प्रतिनिधींकडून स्पष्ट करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai