नगररचना नियुक्तीत परिक्षेचा फार्स
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 12, 2026
- 18
नवी मुंबई ः पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, खुप कमी वेळ अर्ज करण्यासाठी व परिक्षेसाठी दिल्याने ठराविक लोकांच्या नियुक्तीसाठी हा परिक्षेचा फार्स केला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कमीत कमी दोन महिन्यांचा अवधी अभ्यासासाठी मिळावा अशी मागणी ईच्छुकांनी केल्याने पालिका आयुक्त कोणता निर्णय घेतात याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.
पालिकेचा नगररचना विभाग हा अधिकाऱ्यांच्या आवडीचा विभाग म्हणून गणला जातो. या विभागात बांधकाम परवानगी घेताना विकासक सढळ हाताने संबंधित अधिकाऱ्यांना मदत करत असल्याने प्रत्येक अभियंत्याचे या विभागात काम करण्याचे स्वप्न असते. त्यामुळे या विभागात आपली वर्णी लागावी म्हणून संबंधित अभियंते राजकीय दबाव आणत असल्याने अधिकारी/कर्मचारी यांच्या पदस्थापना/बदल्यांमध्ये अधिक पारदर्शकता व सूसुत्रता येण्यासाठी पालिका आयुक्तांनी परिक्षाअंती नियुक्ती करण्याचा निर्णय 27 जुन 2025 रोजी घेतला आहे. ही परिक्षा देण्यासाठी पालिकेत संबंधित अधिकाऱ्याची पाच वर्षाची सेवा पुर्ण होणे, कोणतीही चौकशी सुरु नसणे तसेच 50 टक्के लेखी गुण व 50 टक्के गोपनीय अहवालातील गुणांकन ग्राह्य धरले जाणार आहे.
पालिकेने 19 जुन 2026 रोजी परिक्षा घेण्याची सूचना 9 जुन रोजी जारी केली आहे. वास्तविक पाहता, अभियंता आणि नगररचना विभाग यांच्या कामात कोणतेही साधर्म्य नसल्याने संबंधित परिक्षा घेण्यापुर्वी ईच्छुक अधिकाऱ्यांना तयारीसाठी आवश्यक वेळ देणे गरजेचे आहे. सध्या नगररचना विभागात काम करत असलेले अनेक अभियंत्यांनी यापुर्वी या विभागात काम केलेले असल्याने त्यांना ही परिक्षा सुलभ जाणार आहे. त्यामुळे या विभागात येऊ इच्छिणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांवर हा अन्याय असल्याचे बोलले जात आहे. या परिक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची पारदर्शकता नसल्याची चर्चा असून वास्तविक पाहता, कोणत्याही अधिकाऱ्याला पुन्हा पुन्हा त्याच विभागात काम करण्याची संधी देणे म्हणजे भ्रष्टाचारास प्राधान्य देणे ठरते. त्यामुळे शासनाने तीन वर्षात बदली करण्याचे बंधन घातले आहे. असे असतानाही अनेक अधिकारी ठरावीक कालावधीनंतर नगररचना विभागात आपली वर्णी प्रशासनामार्फत कशी लावतात हे मोठे गुढ आहे.
पालिका आयुक्तांनी परिक्षेचे काढलेले परिपत्रक व तयारीसाठी दिलेला वेळ याचा ताळमेळ बसत नसून सहायक संचालक नगररचना व शहर अभियंता यांच्या मर्जीतील ठराविक अधिकाऱ्यांची वर्णी लावण्याच्या अनुषंगाने ही परिक्षा आयोजित केली जात असल्याची चर्चा सध्या पालिकेत आहे. त्यामुळे या परिक्षेच्या तयारीसाठी कालावधी वाढवून द्यावा तसेच यापुर्वी दोनदा वर्णी लावलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती आयुक्तांनी करु नये अशी मागणी अधिकारी संघटनेकडून करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai