नवी मुंबई रिअल इस्टेट दरात 30% घसरण
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 12, 2026
- 20
पुनर्विकास, सिडकोच्या भूखंड विक्रीचा विकासकांना फटका
नवी मुंबई ः सिडकोने गेल्या चार वर्षात केलेली भूखंडांची प्रचंड विक्री व शहरात सुरु झालेले पुनर्विकासाचे प्रकल्प यामुळे नवी मुंबईतील रिअल इस्टेट दरात 30 टक्के घसरण झाल्याचे चित्र सध्या आहे. रिअल इस्टेट दरात प्रचंड घसरण झाल्याने पुनर्विकास प्रकल्प रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या विकासकांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स आणि सवलती दिल्या जात आहेत. दर कमी करण्यात चढाओढ लागल्याने भविष्यात मोठी घसरण याक्षेत्रात पाहण्यास मिळेल अशी भिती व्यक्त होत आहे.
नवी मुंबईतील विकासासाठी भूखंड उपलब्ध नसल्याने नवी मुंबईतील जमीनीला सोन्याचा भाव मिळत आहे. त्यातच अनेक विकासकांनी चढ्या दराने भूखंड खरेदी केले आहेत. सध्या नवी मुंबईत पुनर्विकासाचे वारे जोरदार सुरु असून अनेक विकासकांनी मोठी गुंतवणूक पुनर्विकास प्रकल्पात केली आहे. त्यातच शासनाने 2020 साली एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहनात्मक नियमावली राज्यातील महापालिका क्षेत्रासाठी लागू केल्याने मुळ चटई क्षेत्राच्या पाचपट चटईक्षेत्र बांधकामासाठी उपलब्ध झाले आहे. ज्या भूखंडावर पुर्वी 40 सदनिका बांधता येत होत्या या विकास नियमांनुसार त्याच भूखंडावर आता 100 हून अधिक सदनिका बांधता येऊ लागल्याने बाजारात सदनिकांचा मोठा पुरवठा झाला आहे. त्याचबरोबर पुनर्विकासामध्येही 3 चटईक्षेत्रासह 60 टक्के ॲन्सिलरी चटईक्षेत्र उपलब्ध झाल्याने मुळ भूखंडावर तिनपट सदनिका बांधल्या जात आहेत.
नवी मुंबई शहरालगत 28 चौ.कि.मी. वर ठाणे-बेलापुर मार्गावर आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या जागेवरही आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने रहिवाशी वापर मंजूर केला आहे. एमआयडीसीनेही अतिरिक्त घरांचा पुरवठा होऊन घरांची किंमत परवडणारी असावी म्हणून 7 चटई निर्देशांक मंजुर केला आहे. या औद्योगिक क्षेत्रात टाटा, रहेजा, आदित्य बिरला, ऑरम गु्रप सारख्या उद्योगसमुहांनी मोठ्या प्रमाणावर मोठे गृहप्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षात घडलेल्या या घडामोडींमुळे मोठ्या प्रमाणावर घरांचा पुरवठा नवी मुंबईत झाल्याने विकासकांना ग्राहक मिळणे मुश्किल झाल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबईत सध्या पुनर्विकासाचे वारे जरी जोरदार वाहत असले तरी भविष्यात रिअल इस्टेट मध्ये होणाऱ्या जीवघेण्या स्पर्धेमुळे पुनर्विकास प्रकल्प रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोठ्या उद्योगसमुहांकडे मोठे भागभांडवल असल्याने ते प्रकल्प पुर्ण करतील पण मध्यम स्वरुपाच्या विकासकाला प्रकल्प पुर्ण करण्यास अडचण येण्याची शक्यता आहे. त्यातच जगभरात युद्धाचे वातावरण असल्याने बांधकाम साहित्याच्या किंमती वाढल्या असून त्याचा फटका घरांच्या किंमतींना बसल्याने सध्या ग्राहकांनीही घरे घेण्याचे टाळले आहे. त्यातच एआय चा मोठा फटका सध्या माहिती व तंत्रज्ञान विभागाला बसल्याने मोठ्या प्रमाणावर कामगारांची कपात होत आहे. या सर्व पार्श्वभुमीवर ग्राहकांनी घर खरेदीकडे पाठ फिरवल्याने विकासकांनी ग्राहकांना मोठी सूट देऊन घरे विकण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे दोन वर्षांपुर्वी चार कोटीला मिळणारे घर सध्या तीन कोटीत उपलब्ध असल्याचे बोलले जात आहे. या घसरलेल्या दरांचा फटका नवी मुंबई रिअल इस्टेटला बसल्याने नागरिकांनी पुनर्विकासाचा विचार पुढे ढकलावा असा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञ देतआहेत.
- विकासकांकडून सूट
घरांचे दर घसरले असले तरी आखाती युद्ध, कर्मचारी कपात यामुळे ग्राहकांनी घर खरेदीकडे पाठ फिरवल्याने विकासकांनी ग्राहकांना घरे विकण्यासाठी मोठी सूट देण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे दोन वर्षांपुर्वी चार कोटीला मिळणारे घर सध्या तीन कोटीत उपलब्ध असल्याचे बोलले जात आहे. - प्रमुख 7 मोठ्या शहरांमधील 5 लाख सदनिकांना फटका
पश्चिम आशियातील वाढत्या युद्धाने आणि जागतिक तणावाने लाखो घर खरेदीदारांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. या तणावामुळे जागतिक व्यापार, कमोडिटी मार्केट आणि आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी कमालीची विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रावरही झाला असून, देशातील प्रमुख 7 मोठ्या शहरांमधील तब्बल 5 लाख 40 हजार फ्लॅट्सची डिलिव्हरी लटकण्याच्या स्थितीत पोहोचली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai