पालिकेत प्रतिनियुक्तीचा रतीब
- by Aajchi Navi Mumbai
- May 13, 2022
- 831
मंत्रालयातील अधिकार्यांचा श्रीमंत महापालिकेकडे ओढा
नवी मुंबई ः नगरविकास विभागाने नवी मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी पाठवण्याचा सपाटा लावला आहे. अनेक अधिकारी पुन्हा पुन्हा प्रतिनियुक्तीवर येत असल्याने पालिकेत नाराजी आहे. पालिकेच्या कारभारावर अंकुश राहावा तसेच या अधिकार्यांच्या माध्यमातून श्रीमंतीचा आस्वाद घेता यावा म्हणून येथे मर्जीतील अधिकार्यांचा रतीब लावल्याची चर्चा पालिकेत आहे.
सध्या नवी मुंबई महानगरपालिकेतील महत्वाची पदे प्रतिनियुक्तीवरील अधिकार्यांनी भरली आहेत. पालिकेचे सेवा नियम मंजुर करताना शासनाने उपायुक्त, सहायक आयुक्त, अतिरिक्त आयुक्त पदांवरील निम्म्या जागा या प्रतिनियुक्तीने भरण्याचे धोरण मंजुर केले आहे. सध्या नवी मुंबई महानगरपालिकेत 12 अधिकारी प्रतिनियुक्तीवर असून यामध्ये मुख्यलेखा व वित्त अधिकारी गेल्या सात वर्षांपासून तर उपायुक्त बाबासाहेब राजळे यांची ही पालिकेतील चौथी प्रतिनियुक्तीवरील वारी आहे.
4 मे रोजी नगरविकास विभागाने मंगला माळवे यांना उपकर निर्धारक व संकलन अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर पाठवले होते. परंतु सदर जागेवर फारसे काम नसल्याने लगेच दुसर्यादिवशी उपायुक्त (कर) असे आदेशात बदल करण्यात आले. मंगला माळवे या दोन वर्षांपासून महापालिकेतच असून त्यांची बदली नागपुर महापालिकेत करण्यात आली होती. परंतु, चारच दिवसात सदर आदेशात सुधार करुन त्यांना उपायुक्त पदावर प्रतिनियुक्तीने महापालिकेत पाठवण्यात आले आहे. हीच बाब पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेठे यांच्याबाबत असून त्यांनाही वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीनेे पुन्हा महापालिकेत पाठवण्यात आले आहे. यापुर्वी मार्च 2020 मध्ये ते प्रतिनियुक्तीने महापालिकेत आले असताना त्यांच्यावर बिनपगारी कार्यमुक्त होण्याची वेळ आली होती. या आदेशात सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर महापालिकेत रुजू होण्याचे नमुद केले आहे. डॉ. राहुल गेठे हे आपली सेवा उसनवारीवर देण्यास परिचित असून यापुर्वी ते शहापुरचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी असताना त्यांनी तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावरकर तर आता ते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांना चौथ्या मजल्यावर विशेष दालनही देण्यात आले आहे.
शासनाकडे मुळात अधिकार्यांची कमतरता असताना व कामाचा मोठा ताण असताना सरकार प्रतिनियुक्तीवर इतर स्थानिक स्वराज्य संस्थांत अधिकारी का पाठवत आहे? असा सवाल विचारला जात आहे. त्यातच प्रतिनियुक्तीवर पाठवताना विशिष्ट अधिकार्यांना झुकते माप दिले जात असल्याचा आरोप होत आहे. प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवून पालिकेवर अंकुश ठेवणे आणि त्याचबरोबर या अधिकार्यांमार्फत होणार्या निविदा प्रक्रियेत आपल्या ठेकेदारांची वर्णी लावण्याची खेळी सध्या नवी मुंबई महापालिकेत पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रतिनियुक्तीचा रतीब जरी लावला असला तरी कोणत्या रतीबाच्या अपेक्षेने अधिकार्यांची वर्णी लावली जात आहे हे समजण्यास नवी मुंबईकर दुधखुळे नाहीत.
मंगळा माळवे यांना पुर्वी सहायक आयुक्त म्हणून पालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविले होते. आता त्यांची पदोन्नती झाल्याने त्यांना उपायुक्त (कर) म्हणून मा. मंत्री व मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने पाठवण्यात आले आहे. शासनाने त्यांना उपायुक्त (कर) म्हणून जरी पाठविले असले तरीही त्यांना कोणती जबाबदारी द्यावी हा आयुक्तांचा अधिकार आहे. - उपसचिव, नगरविकास-14
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai