3 महिन्यात 131 कोटींच्या वीजचोर्या
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 13, 2022
- 619
महावितरणची वीजचोरांवर करडी नजर
मुंबई : वीजचोरीमुळे नियमित वीजबिल भरणार्या प्रामाणिक वीज ग्राहकांवर वीजदर वाढीचा बोजा पडतो. अशा प्रामाणिक व नियमित वीजबिल भरणार्या ग्राहकांचे हित जपणे गरजेचे आहे त्यामुळे महावितरणने वीजचोरी करणार्यांविरोधात कारवाईची बडगा उगारला आहे. त्यानुसार महावितरणच्या भरारी पथकांनी एप्रिल ते जून-2022 या तीन महिन्याच्या काळात वीजचोरीची तब्बल 131 कोटी 50 लाखांच्या 2 हजार 625 प्रकरणे उघडकीस आणली आहेत.
वीजचोरी व विजेचा गैरवापर आणि इतर अनियमिता आटोक्यात आणण्यासाठी तसेच वीजचोरांविरूध्द अतिजलद कारवाई करण्यासाठी विभागीय स्तरावर आणखी दहा नवीन भरारी पथकांची स्थापना करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकतीच सुरक्षा व अंमलबजावणी विभागाची आढावा बैठक घेतली. सध्या महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागात 63 भरारी पथकांसह आठ अंमलबजावणी युनिटस कार्यरत आहेत. या भरारी पथकांनी चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल, मे आणि जून या प्रथम तिमाहीत वीजचोरीची 239.58 दशलक्ष युनिटच्या वीजचोरीची तब्बल 2 हजार 625 प्रकरणे उघडकीस आणून वीजचोरांकडून सुमारे 54 कोटी 16 लाख 66 हजारांचा दंड वसूल केला आहे. उर्वरित बिलांची रक्कमही लवकरात लवकर संबंधितांकडून वसूल करण्यात यावी, असेही निर्देश विजय सिंघल यांनी दिले.
कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत-22, पुणे प्रादेशिक कार्यालय-14, नागपूर प्रादेशिक कार्यालय- 15 तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयालयात - 12 भरारी पथके कार्यरत आहेत. त्यात नोव्हेंबर-2021 पासून विभागीय कार्यालय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या 20 भरारी पथकांचा समावेश आहे. प्रत्येक भरारी पथकाने दर महिन्याला वीजचोरीची जवळपास 20 प्रकरणे उघडकीस आणली आहेत. मागिल तीन आर्थिक वर्षात महावितरणच्या भरारी पथकांनी वीजचोरांवर अंकूश लावण्यात यश मिळविले असून 2019-20 या आर्थिक वर्षात 9250 प्रकरणांत 97.50 कोटींची वीजचोरी उघडकीस आणली. तर 2020-21 या आर्थिक वर्षात कोरोना महामारीत शासनाच्या विविध निर्बंधामुळे वीजचोरांविरूध्द कारवाया करण्यावर मर्यादा आल्या असल्या तरी 7169 एवढ्या मोठ्या संख्येने वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली. यात 87.49 कोटींची वीजचोरी पकडण्यात आली. तर 2021-22 या आर्थिक वर्षात वीजचोरीची तब्बल 13 हजार 370 प्रकरणे उघडकीस आणण्यात भरारी पथकांना यश आले. त्यात वीजचोरीची रक्कम 264.46 कोटी एवढी आहे.
- सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने वीजहानी कमी करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. वीजचोरीच्या एकूण अनुमानित रक्कमेपैकी 2019-20 या आर्थिक वर्षात 54.36 कोटी, 2020-21 या वर्षात 53.18 कोटी तर 2021-22 या वर्षात 124.98 कोटी रुपयांची अनुमानित रक्कमेची वीजबिले वीजचोरांकडून वसूल करण्यात आली. वीजचोरी करणे, विजेचा गैरवापर करणे किंवा अनधिकृतपणे विजेचा वापर करणे हा भारतीय विद्युत कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे ग्राहकांनी प्रामाणिकपणे विजेचा वापर करून कोणत्याही प्रकारे विजेची चोरी करू नये, असेही आवाहन विजय सिंघल यांनी केले आहे.
- रुफटॉप सोलर योजनेचा लाभ घ्या
भारत सरकारच्या नवी व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, महाराष्ट्र शासन व महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये रुफटॉप सोलर योजना राबविण्यात येत आहे. यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात बचत होईल त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले आहे. केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणार्या या योजनेत घरगुती ग्राहक आणि गृहनिर्माण संस्थाना रूफ टॉप बसविण्याकरिता अनुदान देण्यात येतेे. यात घरगुती ग्राहकांना 1 ते 3 कि.वॅ. क्षमतेपर्यंत प्रकल्प खर्चाच्या प्रमाणात 40 टक्के तसेच 3 कि.वॅ. चे वर ते 10 कि. वॅ. पर्यंत खर्चाच्या प्रमाणात 20 टक्के अनूदान दिले जाते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai