नियमबाह्य परवानगीची जबाबदारी आमची नाही
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 16, 2022
- 843
सिडकोच्या पलटीने सर्वांचे धाबे दणाणले
नवी मुंबई ः मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर सिडकोने दिलेल्या 99.39 टक्के बांधकाम परवानग्या या नियमबाह्य असल्याचे शपथपत्र व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी न्यायालयात सादर केले आहे. त्यानंतर आपणच दिलेल्या बांधकाम परवानग्यांची जबाबदारी आपली नसल्याचे पत्र सिडकोने विकासकांना पाठवले आहे. न्यायालयाचा निर्णय विरुद्ध लागल्यास विकासक आणि ग्राहक यांची गुंतवणुक धोक्यात आल्यास त्याबाबत कोणतीही नुकसान भरपाई सिडको देणार नाही असा उल्लेख पत्रात केल्याने विकासकांसह नवी मुंबईत घर घेणार्या ग्राहकांचे धाबे दणाणले आहेत.
नवी मुंबईतील सिडको क्षेत्रात सिडकोच्या बांधकाम परवानगी विभागाने दिलेल्या परवानग्या या नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल सरकारने घेवून सिडकोने दिलेल्या बांधकाम परवानग्या नियमानुसार नसल्याने संबंधित अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश सिडको व्यवस्थापकीय संचालकांना 3 ऑगस्ट 2017 रोजी दिले होते.
सरकारच्या या भुमिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोला समिती नेमून दिलेल्या बांधकाम परवानग्यांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला अनुसरुन संजय मुखर्जी यांनी नेमलेल्या समितीने एप्रिल 2015 पासून दिलेल्या बांधकाम परवानग्या तपासून आपला अहवाल सिडकोला सादर केला. या अहवालानुसार 496 बांधकाम परवानग्यांपैकी 493 बांधकाम परवानग्या नियमानुसार नसल्याचा ठपका आपल्या अहवालात सदर समितीने ठेवला आहे.
या अहवालाच्या अनुषंगाने व्यवस्थापकीय संचालक मुखर्जी यांनी मुंबई उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. त्यापुर्वी प्रकरणाचे गांर्भिय लक्षात आल्याने सिडकोच्या बांधकाम परवानगी विभागाने विकासकांना पत्र पाठवण्यास सुरुवात केली असून सिडकोने दिलेल्या बांधकाम परवानग्यांची जबाबदारी आपली नसल्याचे स्पष्ट केेले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे जर विकासक आणि ग्राहक यांची गुंतवणुक धोक्यात आल्यास त्याची जबाबदारी सिडकोची असणार नसल्याचे सदर पत्रान्वये स्पष्ट केले आहे. सिडकोच्या या ‘तो मी नव्हेच’ या पवित्र्यामुळे विकासकांसह नवी मुंबईत सदनिका विकत घेणार्या ग्राहकांचे धाबे दणाणले आहेत. सिडको स्वतःच दिलेल्या बांधकाम परवानग्यांची जबाबदारी स्वतःच कशी नाकारु शकते? असा सवाल विकासक विचारत आहेत. न्यायालय या गंभीर अनियमिततेबाबत कोणती भुमिका घेते याकडे आता सिडकोसह संबंधित अधिकारी, विकासक आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai