‘नैना' विरोधात प्रकल्पग्रस्तांची वाहन रॅली
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 24, 2023
- 477
23 गावातील हजारो शेतकरी सिडकोवर धडकले ; सिडकोसोबत बैठक आयोजित करण्याची ग्वाही
पनवेल : नैना विरोधात गाव बंद आंदोलनानंतर देखील सरकारकडून आंदोलनाची हवी तशी दखल घेतली न गेल्याने आक्रमक झालेल्या आंदोलकांनी गुरुवारी सिडको कार्यालयावर वाहन मोर्चा काढला. यावेळीही आंदोलकांनी घोषणाबाजी करून प्रकल्पाविरोधातील रोष व्यक्त केला.
नैना प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असल्याने मागील काही दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहेत. नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रातील (नैना) 23 गावांतील ग्रामस्थ गुरुवारी आंदोलनासाठी घराबाहेर पडले. सूमारे दिड हजारांहून अधिक वाहने त्यामध्ये विविध गावातील ग्रामस्थ आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असा आंदोलकांचा जत्था बेलापूरकडे रवाना झाला. खांदेश्वर, कळंबोली सर्कल, कामोठे, खारघर येथे विविध ग्रामस्थ या वाहनफेरीत जोडले गेले. तालुक्यातील विविध गावांमधून सुरु झालेल्या वाहनांच्या मोर्चात मोर्चेकरी टॅक्सी, रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहन घेऊन सामील झाले होते. ग्रामस्थांनी पनवेल शीव महामार्ग रोखू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. रद्द करा रद्द करा, नैना प्रकल्प रद्द करा. नैना प्रकल्पची बाजू मांडणाऱ्या खासदारांचा निषेध असो. जमीन आमच्या मालकीची, नाही कोणाच्या बापाची. देणार नाही, देणार नाही जमीन आमची देणार नाही अशा प्रकारची घोषणाबाजी केली जात होती. तसेच सध्याच्या सरकार विरोधात देखील घोषणाबाजी आंदोलक करत होते.आंदोलक थेट सिडको भवनापर्यंत जाऊ नये असे नियोजन नवी मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केले होते.
- काळे झेंडे दाखवून निषेध
निषेधाचे काळे, लालबावट्याचे लाल आणि पांढऱ्या कपड्यावर रक्तरंजित लाल टिपक्यांचे असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे लावून आंदोलक सिडको विरोधात घोषणाबाजी करत आंदोलनात शांततेत उतरले होते. - शिष्टमंडळासमवेत चर्चा
वाहन मोर्चाने सिडको भवन येथे पोहचलेल्या आंदोलकांच्या शिष्टमंडळाने सिडकोचे अधिकारी राजेश पाटील यांची भेट घेतली आणि आपली भूमिका मांडली. या वेळी पाटील यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकूण घेत ग्रामस्थांची भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यत पोहचवण्याची ग्वाही दिली. मात्र नैना प्रकल्प नकोच अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतल्याने ग्रामस्थांनी सिडको अधिकाऱ्यांसोबत एकत्र बैठक आयोजित करावी, त्यामध्ये नैना प्रकल्पातील फायद्याची माहिती आम्ही देऊ असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai