‘स्वच्छता संग्राम रॅली'तून स्वच्छता जागर
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 04, 2023
- 309
5 हजारहून अधिक महिला, विद्यार्थ्यांचा सहभाग
नवी मुंबई ः महिला कोणतेही काम अत्यंत जबाबदारीने करतात. स्वच्छतेमध्ये तर महिलाच आघाडीवर असतात. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेला स्वच्छोत्सव यशस्वी करण्यासाठी स्वच्छता संग्राम रॅलीत एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांचे व मुलींचे कौतुक करीत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई शहर महाराष्ट्रात नंबर वन आहेच आता आपला उत्साह पाहून देशातही आपण नक्कीच नंबर वन होऊ असा विश्वास व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छोत्सव 2023' अंतर्गत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून व प्रमुख उपस्थितीत 5 हजाराहून महिला व विद्यार्थ्यांनी सहभागी होत यशस्वी केलेल्या ‘स्वच्छता संग्राम रॅली'प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. शून्य कचरा दिनाचे औचित्य साधून पालिकेच्या वतीने स्वच्छता संग्राम रॅली आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 5 हजारहून अधिक महिला व विद्यार्थ्यांनी सहभागी होत स्वच्छ, सुंदर, पर्यावरणशील नवी मुंबईचा एकमुखाने गौरव केला. सेक्टर 26, नेरूळ येथील गणपतशेठ तांडेल मैदानात सायं. 4.30 वाजल्यापासूनच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिला संस्था, मंडळे, बचत गट यांच्या महिला प्रतिनिधी तसेच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, विद्यार्थी यांची एकत्र जमायला सुरूवात झाली होती.
बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे यांनी झेंडा दाखविल्यानंतर रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीचे नेतृत्व करणाऱ्या लेट्स सेलिब्रेट फिटनेस सेवाभावी संस्थेच्या प्रमुख रिचा समीत यांचा यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. ही ‘स्वच्छता संग्राम रॅली' डी मार्ट समोरून सेक्टर 40, 42 मधील रस्त्याने सिवूड ग्रँड सेंट्रल मॉल मार्गे नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे पोहचली. या रॅलीमध्ये स्वच्छता संदेशांचे फलक झळकवित स्वच्छ, सुंदर, प्लास्टिकमुक्त नवी मुंबईचा दमदार प्रचार करण्यात आला. त्यासोबतीने कचरा वर्गीकरण, कचऱ्याची विल्हेवाट, प्लास्टिक वापराला प्रतिबंध अशा स्वच्छताविषयक विविध घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी नागरिकांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून रॅलीला सलामी दिली. अत्यंत शिस्तबध्द रितीने नवी मुंबई वाहतुक पोलीसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करीत रॅली मार्गस्थ होत असल्याने वाहतुकीला कुठेही अडथळा जाणवला नाही. ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे रॅलीची सांगता होत असताना ‘ओलू, सुकू व घातकू' या कचरा वर्गाकरणाविषयी हसतखेळत संदेश देणाऱ्या आरंभ क्रिएशन्स प्रस्तुत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. आयुक्तांसमवेत आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह सर्व मान्यवरांनी आणि उपस्थित हजारो महिला व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai