एमआयडीसीत ‘वसूलीचा’ पालिकेचा मार्ग मोकळा
- by Aajchi Navi Mumbai
- May 29, 2026
- 18
सर्वोच्च न्यायालयाचे मालमत्ताकर वसूलीवर शिक्कामोर्तब
नवी मुंबई ः टिटीसी एमआयडीसी क्षेत्रातील मालमत्ताकर वसूलीवरुन गेल्या 20 वर्षांपासून पालिकेसोबत सुरु असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने पडदा पडला आहे. नवी मुंबई महानगरपालिका टिटीसी एमआयडीसी क्षेत्रातील मालमत्ताकर वसूलीसाठी सक्षम प्राधिकरण असल्याचे न्यायालयाने नमुद केले आहे. त्यामुळे इतक्या वर्षांपासून प्रलंबित असलेला या क्षेत्रातील मालमत्ताकर वसूलीचा पालिकेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
सदर न्यायालयीन प्रकरणात स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असो. मार्फत टिटीसी एमआयडीसी क्षेत्र हे नवी मुंबई पालिकेच्या अधिपत्याखाली येते काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियम व नगररचना अधिनियम 1966 यामधील तरतुदींच्या आधारे हे संपूर्ण क्षेत्र हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येते हे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, टिटिसी एमआयडीसी क्षेत्रासाठी नवी मुंबई महानगरपालिकेला कर लावता येतो काय? याविषयी निर्णय देताना, सर्वोच्च न्यायालयाने कर व शुल्क या दोन्ही बाबी भिन्न असून कर लावण्याचे सार्वभौम अधिकार हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेचे आहेत हे नमूद केले आहे. शुल्क हे वापरलेल्या सेवांसाठीचा अधिभार अथवा मोबदला म्हणून आकारण्यात येते. त्याचा करामध्ये समावेश होत नाही हे देखील मा. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
त्याचप्रमाणे एमआयडीसी केवळ शुल्क आकारू शकते, कर नाही हे नमूद करीत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 127 व 128 अ नुसार टिटीसी एमआयडीसी क्षेत्रात कर आकारण्याचा अधिकार नवी मुंबई महानगरपालिकेचा आहे हे देखील स्पष्ट केले आहे. अशा रितीने सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही बाजूंवर स्पष्टता दिलेली आहे. यामुळे डबल टॅक्स आकारला जात नाही हे देखील स्पष्ट झाले आहे.
- लघुउद्योजकांनी करभरणा करण्याचे आवाहन
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत कराव्दारे जमा महसूलातून शहर विकासाची कामे केली जात असून या माध्यमातून महानगरपालिकेस मिळणारा महसूल शहर विकासाला नवी गती देणारा असल्याचे मत व्यक्त करीत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करीत सर्व लघुउद्योजकांनी मालमत्ताकर भरून शहर विकासात आपले योगदान द्यावे असे आवाहन केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai