डॉ.नरेंद्र जाधव यांनी मांडले बहुआयामी बाबासाहेबांच्या प्रतिभेचे पैलू
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 13, 2023
- 406
नवी मुंबई ः पालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये आयोजित जागर 2023 या व्याख्यान शृंखलेंतर्गत डॉ. नरेंद्र जाधव यांनी बाबासाहेबांच्या विश्वव्यापी व्यक्तीमत्वातील 12 विविध पैलूंवर भाष्य करीत माहितीपूर्ण विहंगम दर्शन घडविले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रज्ञासूर्य असे सांगत विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर : बहुआयामी व्यक्तिमत्व या विषयाच्या अनुषंगाने डॉ. नरेंद्र जाधव यांनी ज्ञानमार्गी, अर्थतज्ज्ञ, समाजसुधारक, अर्थप्रशासक, शिक्षणतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, कायदेतज्ज्ञ, राजकीय मुत्सद्दी, भारतीय संविधानाचे प्रधान शिल्पकार, भाषावार प्रांत विश्लेषक, बौध्दधम्म प्रवर्तक अशा 12 विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण माहितीचा खजिना खुला केला. यामधील प्रत्येक पैलूवर विविध उदाहरणे देत, प्रसंग सांगत डॉ. नरेंद्र जाधव यांनी बाबासाहेबांनी प्रत्येक क्षेत्रात घेतलेल्या उत्तुंग भरारीची माहिती दिली. ज्ञान संपादनाची विलक्षण ओढ असणारे ‘ज्ञानमार्गी आंबेडकर' मांडताना त्यांनी 18-18 तास एकाग्रतेने अभ्यास करणाऱ्या बाबासाहेबांच्या ग्रंथप्रेमाचे विविध दाखले दिले. जागतिक अर्थप्रणालीचा प्रचंड अभ्यास असणारे बाबासाहेब आपल्या देशासाठी कोणती आर्थिक प्रणाली योग्य ठरेल याचे स्पष्ट निदान करणारे भविष्यवेधी अर्थतज्ज्ञ असल्याचेही विविध उदाहरणे देत डॉ. नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केले. 1924 साली स्थापित केलेल्या बहिष्कृत हितकारिणी सभेचे शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा हे घोषवाक्य बाबासाहेबांच्या जीवन चरित्रातील एक महत्वाचा भाग असल्याचे सांगत मानवी हक्काचे कठोर पुरस्कर्ते म्हणून समाजसुधारक बाबासाहेबांच्या विविध आंदोलनांची, संघर्षशील घटनांची विस्तृत माहिती त्यांनी दिली. प्रचंड लोकशाहीवादी असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जातीभेद निर्मूलन करणारे थोर समाजशास्त्रज्ञ होते असेही डॉ. नरेंद्र जाधव यांनी विविध प्रसंग कथन करीत स्पष्ट केले. सकल मानवाच्या कल्याणाचा विचार करणारे मानववंशास्त्रज्ञ हा देखील बाबासाहेबांचा एक वेगळा पैलू असल्याचे त्यांनी सोदाहरण सांगितले. कायदेतज्ज्ञ म्हणून बाबासाहेबांनी सर्वसामान्य माणसाच्या न्याय व हक्कांसाठी विविध आंदोलनातून लढा दिलाच शिवाय कायदेमंत्री म्हणून अनेक लोकहितकारी व विशेषत्वाने स्त्री कल्याणकारी कायदे केले हे त्यांचे मोठेपण असल्याचे डॉ. नरेंद्र जाधव यांनी सांगितले.
बहुआयामी प्रतिभावंत बाबासाहेबांच्या 12 विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण भाष्य करताना बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाला सामावून घेणाऱ्या कवितांच्या ओळींचा शोध घेत असताना शेक्सपियरच्या ओळी सर्वाधिक योग्य वाटल्या असे सांगत डॉ. नरेंद्र जाधव यांनी, पंचमहाभूते या व्यक्तीत अशाप्रकारे एकत्र आली होती की निसर्ग साक्षात खडबडून जागा झाला आणि म्हणाला, याला म्हणतात माणूस - या कवितांच्या ओळी उधृत केल्या त्याला उपस्थितांनी टाळ्यांची प्रचंड दाद दिली. तसेच स्मारक कसे असावे याचा अत्यंत उत्तम नमुना म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा जपणारे हे अव्दितीय स्मारक असल्याचे मत नामांकित अर्थतज्ज्ञ, विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. याठिकाणी नित्यनेमाने विचारांचा जागर केला जातो, त्यामुळे हे स्मारक स्थितीशील नाही तर गतीशील आहे अशी भावना त्यांनी अभिव्यक्त केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai