भंगार गोदामाला भीषण आग
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 28, 2023
- 500
उरण ः उरण-मोरा रस्त्यालगत असलेल्या बोरी येथील एका भंगार गोदामाला शुक्रवारी (27) भीषण आग लागली. या आगीमध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी या गोदामाच्या आजूबाजूला असलेल्या इमारतींचे आणि झोपड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
उरण शहरात बोरी पाखाडी हद्दीत भंगाराची अनेक अनधिकृत गोदामे आहेत. विविध शासकीय विभागांच्या जागेवर अतिक्रमण करून नगरपरिषद आणि पोलिसांच्या आशिर्वादाने ही भंगाराची दुकाने सुरू आहेत. हे भंगाराचे गोदामही रमझान नामक एका परप्रांतियाने थाटले होते. प्लास्टिक, लाकडाचे पॅलेट, प्लायवूड, केबल,रासायनिक केमिकलचे ड्रम, लोखंड आणि ज्वालाग्राही पदार्थांनी गोदाम भरलेले होते. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास येथे जवळच असलेल्या ट्रान्सफार्मरमध्ये शॉर्ट-सर्किट झाल्याने आग लागली. गोदामात ज्वलनशिल वस्तू आणि रसायने असल्यामुळे या आगीने अल्पावधीतच रौद्र रूप धारण केले. आगीचे स्वरूप पाहिल्यानंतर शेजारील इमारतीतील अनेक कुटूंबांना इमारतीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आजुबाजुच्या इमारतींमधील गॅस सिलेंडर, वीज पुरवठाही बंद करण्यात आला. आगीची तीव्रता इतकी होती की बाजूला असलेल्या इमारतींची तावदाने, पाण्याच्या टाक्याही फुटल्या. या आगीमुळे जीवीत हानी झाली नसली तरी शहरातील अनधिकृत भंगार दुकांनांचा आणि गोदांमाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगरपरिषद हद्दीत रस्त्याच्या कडेला आणि शासकीय जागांवर अनेक भंगारांची दुकाने थाटली आहेत. स्थानिक प्रशासनच याला कारणीभूत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी जमलेल्या नागरीकांनी व्यक्त केल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटना स्थळावर धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai