ज्येष्ठांना एनएमएमटीचा मोफत प्रवास
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 18, 2023
- 233
नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणारे शहर ही नवी मुंबईची ओळख असून आता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा 13 नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली असून नवी मुंबईकर ज्येष्ठांना दिवाळी भेट देण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने नुकतेच तसे जाहीर करण्यात आले असून ज्येष्ठ नागरिकांना आणखी एक दिलासा मिळालेला आहे.
नवी मुंबईकर प्रवाशांना समाधानकारक सेवा पुरविणारा उपक्रम म्हणून नवी मुंबईकरांची नेहमीच एनएमएमटी प्रवासाला पसंती लाभली असून नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील 205 डिझेलवर चालणाऱ्या, 85 सी.एन.जी. वर चालणाऱ्या तसेच 56 वातानुकूलीत व्होल्वो आणि 195 वातानुकूलीत इलेक्ट्रीक अशा एकूण 541 बसेस आहेत. नमुंमपा परिवहन उपक्रमामार्फत नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत व हद्दीबाहेर मुंबई, बोरिवली, ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, खोपोली, कर्जत, रसायनी आणि उरण या भागात 43 सर्वसाधारण व 32 वातानुकुलीत अशा एकूण 75 बस मार्गांवर प्रवाशी सेवा देण्यात येत आहे. सद्यस्थितीत परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या नवी मुंबई पालिका क्षेत्रातील 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा आदर करीत त्यांना बस प्रवास शुल्कात 50 टक्के सवलत दिली जात आहे. परंतु, या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत देण्यात यावी अशी मागणी नमुंमपा क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व लोकप्रतिनिधी यांचेकडून सातत्याने होत होती. याबाबत सकारात्मक विचार करून नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर 13 नोव्हेंबर 2023 पासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असणाऱ्या 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या एनएमएमटी बसचा प्रवास मोफत असेल असे जाहीर केले आहे.
हा प्रवास करण्यासाठी 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी नमुंमपा परिवहन उपक्रमाचे ओळखपत्र प्राप्त करून घेणे गरजेचे राहील. ओळखपत्राकरिता वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्याचा पुरावा म्हणून जन्म तारखेचा दाखला अथवा पूर्ण जन्मतारीख नमूद असलेले आधार कार्ड सादर करणे आवश्यक असेल. तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवास पुरावा म्हणून मालमत्ताकर त्या ज्येष्ठ नागरिकाच्या स्वत:च्या कुटुंबाच्या व्यक्तीच्या नावावर असलेले कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. भाडेपट्टीवर राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांनी घराचा करारनामा किंवा नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये किमान 05 वर्षे रहिवाशी असल्याचा तहसिलदाराचा दाखला सादर करणे आवश्यक असेल. अशा सर्व कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना परिवहन उपक्रमाचे ओळखपत्र प्राप्त करून घेता येईल. त्याकरिता कागदपत्राच्या मूळ व दोन छायांकीत प्रती तसेच पासपोर्ट आकारचे तीन फोटो सादर करणे आवश्यक राहील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai