पालिकेचे स्वच्छ शौचालय अभियान
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 06, 2023
- 295
नवी मुंबई ः स्वच्छतेमध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान लाभलेली नवी मुंबई महापालिका केंद्र व राज्य शासनाच्या सर्वच अभियानांमध्ये पुढाकार घेऊन काम करताना दिसते. अशाच प्रकारे केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छ शौचालय अभियान' कार्यक्रमातही महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिका उत्साहाने सहभागी झालेली आहे.
19 नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिवसापासून अभियानाला प्रारंभ झाला असून 25 डिसेंबर या सुशासन दिनापर्यंत अभियान कालावधी असणार आहे. या पाच आठवड्यांच्या कालावधीत सर्व शौचालयांमध्ये स्वच्छता व देखभाल विशेष मोहीम राबवली जाणार असून शौचालयांमध्ये Functional, Accessibility, Clean, Eco-friendly आणि Safe अशाप्रकारे कार्यान्वित, प्रवेशयोग्य, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित अशा बाबींनुसार शौचालय तपासणी करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत महिला बचत गटांद्वारे शौचालयांची तपासणी करण्यात येणार असून त्याची वर्गवारी केली जाणार आहे. या माध्यमातून महिला बचत गटांचे सक्षमीकरणही केले जाणार आहे. यासाठी महिला बचत गटांची नियुक्ती करण्यात येत असून त्यांना रितसर प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिला बचत गटांचे हे तपासणी समूह शौचालयांना भेटी देऊन त्यांची प्रत्यक्ष पाहणी करत दिलेल्या निकषानुसार त्यांचे मूल्यांकन करून शौचालयांना श्रेणी देतील. याप्रमाणेच स्वच्छ शौचालय चॅलेंज जाहीर करण्यात आले असून 5 डिसेंबर ते 15 डिसेंबर हा या अभियानाचा कालावधी आहे. या अंतर्गत स्वच्छ शौचालयांना स्वच्छ भारत सार्वजनिक शौचालय असा गुणवत्तेचा दर्जात्मक शिक्का प्राप्त होणार आहे.
अभियानाच्या अनुषंगाने पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी विविध शौचालयांना भेटी देत तेथील केअरटेकरना अधिक गुणात्मक काम करण्याच्या सूचना दिल्या व शौचालयातील स्वच्छतेची आणि सुविधांची पाहणी केली. स्वच्छता विषयक नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी नवी मुंबई पालिका या स्वच्छ शौचालय अभियानाच्या अनुषंगाने तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय, माहिती शिक्षण व प्रसारासाठी वॉल स्ट्रक्चर उभारणी, स्वच्छतागृहातील वर्तनाविषयी जागरूकता, प्रभागातील शौचालयांच्या स्थितीविषयी चर्चा तसेच शौचालयांची देखभाल करणाऱ्या केअरटेकरला बेस्ट केअर टेकर पुरस्कार देऊन गौरविणे असे नानाविध उपक्रम राबविणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai