स्वच्छतेत नवी मुंबई अव्वलच
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 11, 2024
- 523
देशात दुसरा तर राज्यात नंबर वन
नवी मुंबई ः महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये तृतीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त केले असून महाराष्ट्र राज्यात सातत्याने पहिले स्थान कायम राखले आहे. यावर्षी इंदोर आणि सुरत शहरांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला असून त्यानंतर नवी मुंबईचाच क्रमांक आहे. याशिवाय कचरामुक्त शहराचे सर्वोच्च सेव्हन स्टार मानांकन नवी मुंबईने प्राप्त केले असून सेव्हन स्टार प्राप्त करणारे हे राज्यातील एकमेव व देशातील अवघ्या 2 शहरांमधील एक शहर आहे. त्यासोबतच हागणदारीमुक्त शहरांच्या ओडीएफ कॅटेगरीत नवी मुंबईने वॉटरप्लस हे सर्वोच्च मानांकन कायम राखले आहे.
नवी दिल्ली मध्ये भारत मंडपम येथे झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या भव्यतम पारितोषिक वितरण समारंभात भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंह पुरी व केंद्रीय सचिव मनीष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत अभियानाचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे तसेच अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील व शिरीष आरदवाड उपस्थित होते. स्वच्छता ही आता नवी मुंबई शहराची ओळख बनलेली असून शहर स्वच्छतेविषयी जागरूक असणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांचा वाढता सक्रिय सहभाग यामुळेच नवी मुंबईचे स्वच्छतेमधील मानांकन सतत उंचावत राहिले असून त्याची फलश्रुती असलेला हा पुरस्कार स्वच्छताप्रेमी नागरिक व स्वच्छताकर्मींच्या योगदानाला समर्पित असल्याचे सांगत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा राष्ट्रीय पुरस्कार स्वच्छताकर्मी, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिक व प्रसारमाध्यमे अशा सर्वांच्या एकत्रित कामाचे फलित असल्याचे मत व्यक्त करताना समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
थ्री आर संकल्पने अंतर्गत थ्री आर सेंटर्स, रिसायकल मार्ट व रिसायकल बाजार, थ्री आर ऑन व्हिल्स या अभिनव संकल्पनांनाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत राबविला जाणारा ड्राय वेस्ट बँक सारखा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी प्रोत्साहित करणारा आहेच, शिवाय त्यांना स्वच्छतेची गोडी लावून त्यांच्या मनावर स्वच्छतेचे संस्कार करणारा आहे. तसेच गेमींग झोन या आगळ्यावेगळ्या संकल्पनेची राष्ट्रीय पातळीवर विशेष नोंद घेण्यात आली आहे. शहर सुशोभिकरणात आकर्षक भित्तीचित्रे, लक्षवेधी शिल्पाकृती, उजळलेले उड्डाणपूल, झळाळणारे अंडरपास, आकर्षक विद्युत खांब अशा गोष्टींमुळे शहर अधिक शोभिवंत झाले. स्वच्छन्द काव्य संगीत संध्या या अभिनव साहित्यिक उपक्रमाची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. अशा विविध प्रकारे केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण स्वच्छता कामांचे फलित म्हणजे मिळालेला पुरस्कार आहे.
- गुणांकनाचे मुद्दे
‘स्वच्छ सर्वंक्षण 2023'च्या सर्वेक्षणांतर्गत ‘स्वच्छ भारत मिशन'च्या केंद्रीय तपासणी पथकाने परीक्षणात कागदपत्रे तपासणीप्रमाणेच शहर स्वच्छतेविषयी नागरिकांचे अभिप्रायही जाणून घेतले व गुणांकन केले. केंद्रीय स्वच्छता निरीक्षक पथकांव्दारे कोणतीही पूर्वकल्पना न देता महानगरपालिका क्षेत्रातील स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. ही पाहणी करताना परीक्षण समितीने तेथे भेटलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्याकडून शहरातील स्वच्छतेविषयी प्रत्यक्ष अभिप्राय घेतले. त्याचप्रमाणे मिशनमार्फत स्वच्छता ॲप, दूरध्वनी यावरूनही नागरिकांच्या शहर स्वच्छता विषयक प्रतिक्रियांची नोंद घेण्यात आली. - वैशिष्टयपूर्ण कामे :
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023' मध्ये सहभागी होताना नवी मुंबई महानगरपालिकेने प्रभावी लोकसहभागावर भर दिला. विशेष म्हणजे ‘स्वच्छतेसाठी पुढाकार नागरिकांचा, आजचा दिवस स्वच्छताकर्मींच्या सन्मानाचा' हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून महानगरपालिकेच्या आठही विभागांमधील 2 ते 4 हजार नागरिकांनी वेगवेगळ्या दिवशी स्वच्छताकर्मींना त्यांच्या रोजच्या स्वच्छतेच्या कामापासून एक दिवसाची सुट्टी देत रस्त्यावर उतरून संपूर्ण विभाग स्वच्छ केला आणि स्वच्छताकर्मींच्या कार्याचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने सन्मान केला.
- बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड
1. लाख 14 हजारहून अधिक नागरिक व विद्यार्थ्यांनी आठ विभागात एकाच वेळी एकत्र येऊन स्वच्छता शपथ घेतली तसेच खारफुटी स्वच्छता मोहीम राबविली.
2. 26 हजारहून अधिक नागरिकांनी एका दिवसात डिजिटल स्वच्छता शपथ घेतली
3. स्वच्छ चित्रकला स्पर्धेत तब्बल 2 लाख 83 हजार 144 विद्यार्थ्यांनी विक्रमी सहभाग घेतला
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai