गुढीपाडव्यासाठी बाजार सजला
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 06, 2024
- 568
मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला शहरात प्रचंड खरेदी होते. महागाई वाढली असली तरीही यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने आणि वस्त्रप्रावरणांच्या बाजारात ही उलाढाल अपेक्षित आहे.
शहर-उपनगरातील एपीएमसी, मिनी मार्केट, अशा वेगवेगळ्या मार्केट्समध्ये खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. बाजार गुढीपाडव्याचे साहित्य आणि वस्तूंनी भरून गेला आहे. गुढीसाठी लागणाऱ्या नव्या काठीसह रेशमी-तलम, लहान तांब्या, कृत्रिम फुलांचा हार, पाने, माळा आणि साखरगाठीची खरेदी सुरू झाली आहे. पारंपरिक सजावट केलेल्या नावीन्यपूर्ण रंगीबेरंगी रेडिमेड गुढी विक्रीसाठी उपलब्ध असून साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी दिसून येत आहे. तसेच रेडिमेड गुढीला ग्राहकांची जास्त पसंती आहे. यंदा रेडीमेड गुढीच्या किमंती 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. लाल, पिवळा, नारंगी आणि पांढऱ्या रंगांच्या तसेच ड्रायफ्रुट असलेल्या साखरगाठींनी दुकाने सजली आहेत. गुढीपाडव्याला अवघे काही दिवस उरल्याने साखरगाठींच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शोभायात्रांचीही जल्लोषात तयारी सुरू झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा काढण्याची परंपरा असल्याने शहरातील अनेक मंडळे तयारीत व्यस्त आहेत.
- रेडिमेड गुढीला, साडीला पसंती
नऊ इंचाची रेडिमेड गुढी 100 ते 120 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. एक फुटाची रेडिमेड गुढी 150 रुपयांपासून मिळत आहे. दीड फुटाच्या गुढीची किंमत 200 ते 250 रुपये आहे. सजवलेल्या गुढी दर्जा व आकारानुसार 900 ते 1,200 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर लाल, गुलाबी, पिवळा, नारंगी, गुलाबी रंगाच्या साखरगाठी 20 रुपये ते 100 रुपयांपर्यंत मिळत आहे. तसेच रेडिमेड गुढीच्या वस्त्रांना महिलांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पैठणी, जरीकाठ, रेशन काठ, खाण-काठाची रेडिमेड साडी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. - ग्राहकांसाठी ऑफर
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वस्तूंबरोबरच खरेदीदार नवा टीव्ही, रेफ्रिजरेटर, संगणक, लॅपटॉप तसेच उंची मोबाइलच्या खरेदीवर जास्त भर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक आकर्षित करण्यासाठी शोरूम व ऑनलाईन खरेदीवर मोठ्या प्रमाणात ऑफर ठेवल्या आहेत. - दागिन्यांचीही उलाढाल होणार
शहर आणि परिसरातील सराफी पेढ्यांमध्ये मोठी गर्दी आणि उलाढाल अपेक्षित आहे. मागील पाच ते सहा वर्षांत सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र दागिने खरेदी करण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. आपल्याला परवडेल तितक्या किमतीचे दागिने मुहूर्तावर खरेदी करण्याची परंपरा जपत आले आहेत. - गृहखरेदीसाठी सवलती
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला नवीन वस्तू खरेदी करण्याचा अनेकांचा कल असतो. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांसाठी बांधकाम व्यावसायिकांकडूनदेखील आकर्षक जाहिराती केल्या आहेत. - पुरणपोळी विक्रीसाठी दाखल
गुढीपाडव्यासाठी घरगुती व विविध खाद्यपदार्थांच्या दुकानात, ग्राहकवर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळी विक्रीसाठी आल्या आहेत. तसेच केसर, ड्रायफ्रूट, पुष्पखंड, स्ट्रॉबेरी, आम्रखंड अशा विविध प्रकारचे श्रीखंडदेखील पुरणपोळीच्या शेजारी विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना धावपळीच्या जीवनात पुरणपोळी करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे त्या रेडिमेड पुरणपोळीला अधिक पसंती देत आहेत. सध्या पारंपरिक पद्धतीबरोबरच विविध प्रकारे पुरणपोळी बनवली जाते. डाळ, खोबरे, मूगडाळ, तीळ, गाजर, खजूर, खव्याची पुरणपोळी, शुगर फ्री, अननस, गुलकंद, चॉकलेट, बदाम, फणस, ड्रायफ्रूट असे विविध पुरणपोळींचे प्रकार उपलब्ध आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai