मार्केट त्वरित वापरात आणा
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 22, 2024
- 329
आयुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी
नवी मुंबई ः पालिकेच्या बांधून तयार झालेल्या वास्तू विहित प्रयोजनासाठी वापरात याव्यात असे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागांच्या आढावा बैठकीत दिले होते. त्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील मार्केटच्या इमारती वापरात येण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांसह मार्केट इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करुन त्या वापरात येण्याच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्या. सूचना केलेल्या बाबींची तातडीने अंमलबजावणी करुन ही मार्केट तत्परतेने सुरु करावीत असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
दिवाळेगाव येथील मासळी मार्केटची पाहणी करताना आयुक्तांनी तेथील अंतर्गत व परिसर स्वच्छतेवर अधिक भर देण्याच्या सूचना केल्या. त्या ठिकाणी सदयस्थितीत पोर्टेबल स्वरुपाची शौचालये ठेवलेली असून तेथे कायमस्वरुपी शौचालय बांधावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. तेथील भाजीपाला व फळे विक्रीसाठीचे गाळे योग्य विक्रेत्यांना वितरीत करण्याची कार्यवाही तत्परतेने करण्याचेही निर्देशित करण्यात आले. से.4, सानपाडा येथील भूखंड क्र.17 वर महानगरपालिकेने बांधलेल्या दैनंदिन बाजार इमारतीची पाहणी करताना विक्रेत्यांना व ग्राहकांना सोयीचे व्हावे यादृष्टीने तेथील ओटल्यांची रचना काहीशी बदलून ती टेबल स्वरुपाची करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. हे काम तत्परतेने करुन मार्केट त्वरित वापरात आणण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अशाचप्रकारे से.14, सानपाडा येथील मार्केटमध्येही बाहेरच्या बाजूस वेदरशेड करण्याच्या सूचना करुन त्याठिकाणी असलेल्या दुसऱ्या प्रवेशव्दारावरुन नागरिकांना सुलभतेने ये-जा करण्यासाठी तेथे पायऱ्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. वाशी से.1 येथील मार्केटमधील ओटल्यांची रचना बदलण्याचे सूचित करुन आयुक्तांनी त्याठिकाणचेही छत बाहेरच्या बाजूस वाढवून वेदरशेड टाकावी तसेच वरील बाजू हवा खेळती राहण्यासाठी मोकळी ठेवण्याचे निर्देश दिले. या मार्केटच्या अंतर्गत भागातील सुधारणा तत्परतेने करुन घ्याव्यात व मार्केटची इमारत लगेच वापरात आणावी असे निर्देश देण्यात आले. सर्वच मार्केटमध्ये अंतर्भागात पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या छोटया गटारींमध्ये पाणी थांबून राहणार नाही अशाप्रकारे उतार असावा व टाईल्स असाव्यात असेही आयुक्तांनी सूचित केले.
वाशी से.9 येथील एनएमएमटी बस टर्मिनस व वाणिज्य संकुल बांधकामाचीही पाहणी आयुक्तांनी करीत येथील बस टर्मिनसमध्ये बसेस आल्यानंतर नागरिकांना ये-जा करताना अडचण होणार नाही अशा प्रकारे बेंचेस बसवावेत व रचना करावी असे निर्देशित केले. याठिकाणी भाडेतत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या ऑफिसेस व व्यावसायिक संकुले यांचा वापर लवकरात लवकर सुरु होण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाहीला गती देण्यात यावी अशाही सूचना आयुक्तांनी केल्या. या दौऱ्याच्या अनुषंगाने आयुक्तांनी नवी मुंबई क्षेत्रातील पावसाळी स्थितीचीही पाहणी केली व निदर्शनास आलेल्या बाबींमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai